इजिप्तमध्ये स्थानिक भूल वापरून शस्त्रक्रियेचे सादरीकरण : कैरो येथे १९ वी जागतिक परिषद संपन्न
पुणे : मुळव्याध तज्ञ डॉ. सुनिल दिवाकर अंभोरे यांना इजिप्तमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक मुळव्याध परिषदेत स्थानिक संज्ञाहरण (लोकल अनास्थेशिया / प्यूडेंडल नर्व्ह ब्लॉक) वापरून शस्त्रक्रियेचे सादरीकरण करण्याचा बहुमान मिळाला. भारतातून केवळ चार तज्ञांची निवड परिषदेसाठी करण्यात आली होती, त्यामध्ये डॉ. अंभोरे यांचा समावेश होता.
कैरो येथे संपन्न झालेली ही परिषद इजिप्शियन सोसायटी ऑफ कोलन अॅन्ड रेक्टम,मेडिटेरिनियन सोसायटी ऑफ पेल्विक फ्लोअर डिसऑर्डर्स आणि कैरो पेल्विक फ्लोअर अॅन्ड कोलोरेक्टल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. हे परिषदेचे १९ वे वार्षिक अधिवेशन होते.
या परिषदेसाठी भारतासह एकूण १९ देशांमधून विविध मुळव्याध तज्ञ, कोलोरेक्टल सर्जन आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. अंभोरे यांनी पेनलेस लोकल अनेस्थेशिया (प्यूडेंडल नर्व्ह ब्लॉक) वापरून मुळव्याध, भगंदर, फिशर आणि पायलोनिडल साइनस यांसारख्या विकारांवरील शस्त्रक्रिया कशा सुरक्षित, वेदनारहित आणि रुग्णस्नेही पद्धतीने करता येतात याचे प्रत्यक्ष सादरीकरण परिषदेत केले.
त्यांच्या नवीन आणि प्रभावी कामाच्या पद्धतीला आणि कौशल्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय पद्धतीचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे.

