संदीप देशपांडे यांना दिले प्रत्युत्तर, चांगल्या कामात अडथळे आणण्यासाठी पक्षाबाहेरून यांना कोणी ऑपरेट करतेय ?
मुंबई-राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताचा विषय मांडला. त्याला उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद देखील महाराष्ट्राच्या हिताचा होता. मात्र, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे काही लोकांना वाटत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र हितासाठी दोन भाऊ एकत्र येण्यावर सहमती होत आहे. तर त्यामध्ये वाद करण्यासारखे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या समोर कोणत्याही अटी-शर्ती ठेवलेल्या नसल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हिताच्या फॉर्मुलामध्ये भारतीय जनता पक्ष बसत नाही. त्यांच्यासोबत असलेले लोक या फॉर्मुलात बसत नाही. त्याला तर कोणी अटी आणि शर्ती म्हणत असतील, तर त्यांनी थोडा विचार करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी काम करायला तयार आहोत. माझ्यासारखा माणूस देखील त्यासाठी सकारात्मक आहे.
मी अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. मी श्रीकांत ठाकरे सोबत देखील एकत्र काम केले आहे. आता मी आदित्य सोबत देखील काम करत आहे. मात्र महाराष्ट्र हित कशात आहे? मराठी माणसांचा स्वाभिमान कशात आहे? हे आम्हाला माहिती आहे. बाळासाहेबांचे ध्येय महाराष्ट्र आणि मराठी माणूस होता. त्यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगले आहे. तर आम्ही त्यांचे स्वागतच केले आहे. केवळ महाराष्ट्र द्रोही असलेल्या लोकांना पंगतीला देखील बसू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याचे संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे यांनी जे विधान केले आहे, त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रति विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते काय बोलतात, त्यावर मी उत्तर देणार नाही. राज ठाकरे बोलल्यानंतर त्यावर बालू. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य देत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे
महाराष्ट्र द्रोही कोण? हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि ते जर तुम्हाला समजत नसेल, तर राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल. अशा शब्दात संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे अत्यंत हुशार नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना देखील महाराष्ट्र द्रोही कोण? हे माहिती आहे. मात्र, काही लोक चांगल्या कामात अडथळे निर्माण करत असतील, तर पक्षाच्या बाहेर राहुन कोणीतरी हे सर्व ऑपरेट करत आहे, हे मी ठामपणे सांगू सांगतो. या माध्यमातून संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

