पुणे- येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझीट अभावी उपचार नाकारल्याने तनिशा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे वृत्त येथे आले आहे. ईश्वरी उर्फ तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणी उपचारांमध्ये निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलम 106 एक नुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर घटनेच्या 22 दिवसानंतर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत प्रियांका पठारे यांनी डॉ. घैसास यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाबाबत सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल सादर झाल्यावर डॉ. सुश्रुत घैसास यांनी रुग्णालयाचे मानद प्रसुती तज्ञ पदाचा राजीनामा दिला आहे. मागील दहा वर्ष ते रुग्णालयात काम करत होते. राजीनामा पत्रा मध्ये त्यांनी सांगितले की, माझ्यावर सध्याच्या परिस्थितीत दबाव निर्माण झाला आहे. मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे, माझ्या कामावर देखील परिणाम होत आहे, मी रात्री झोपू शकत नाही, रुग्णालयाची देखील बदनामी होत आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे, असे सांगितले होते.त्यानंतर विश्वस्त मंडळाने त्यांचा राजीनामा मंजूर केला.
ईश्वरी उर्फ तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात वेगवेगळे चार चौकशी अहवाल पोलिसांना आतापर्यंत प्राप्त झाले आहे. राज्य सरकारने नेमलेल्या आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तसेच भिसे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर देखील दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, ससून रुग्णालयाने केलेल्या चौकशीमध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तसेच डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा या प्रकरणात कोणताही दोष नसल्याचा सहा पानी अहवाल पुणे पोलिसांना सादर केला. त्यानंतर ससून रुग्णालय अहवालावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार, तनिषा भिसे यांच्या प्रकृतीत इंदिरा आयव्हीएफमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यानंतरही त्यांना 4-5 दिवस दाखल करून घेण्यात आले. ही एक मोठी चूक होती. गरोदर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची गरज होती. या सर्वात आयव्हीएफ सेंटरची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी रुग्णास लवकर दुसरीकडे पाठवणे गरजेचे होते.
तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. यासंबंधीच्या रिसिप्टवर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती. सत्ताधारी महायुतीसह विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी यासंबंधी दीनानाथ रुग्णालयाबाहेर निदर्शने केली होती. पण आता ससून रुग्णालयाच्या अहवालात डॉक्टर घैसास व दीनानाथ रुग्णालयाला क्लीनचिट देण्यात आली आहे.

