मुंबई- महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या मार्गावर दिसू लागले आहेत . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी याबाबतचे संकेत दिले. राज ठाकरे म्हणाले- आपल्यात राजकीय मतभेद आहेत, वाद आहेत, मारामारी आहेत, पण महाराष्ट्रासमोर या सर्व खूप लहान गोष्टी आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणे ही फार मोठी अडचण नाही.
राज ठाकरे यांनी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर तसे स्पष्ट संकेत दिले. महेश मांजरेकर यांनी राज यांना उद्धव यांच्याशी युती करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या ध्येयासमोर आमच्यातील भांडणे लहान आहेत. यावर उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया आली आहे, त्यांनी सांगितले की माझ्याकडून कधीही भांडण झाले नाही.
आगामी महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधुच्या अस्तित्वाचा प्रश्न
राज ठाकरेंनी नुकत्याच महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये युतीसाठी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला.राज ठाकरे म्हणाले, मी युतीसाठी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चूक नाही. आमच्यातील भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र खूप मोठा आहे.विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला. मनसेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधुच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.
भाजपच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर विरोध– अंबादास दानवे
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी तयार असल्याच्या जरी जाहीर केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, राज ठाकरे भाजपचा विरोध करणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. तर, अंबादास दानवे यांनी म्हटले की, असा प्रसारमाध्यमांमध्ये प्रस्ताव देऊन काही होत नसते. खरच मनात इच्छा असेल तर इतर मार्ग असतात. महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर स्वागत केले पाहिजे पण भाजपच्या हितासाठी पाऊल उचलत असतील तर विरोध केला पाहिजे.
…राज ठाकरेंसोबत जाण्यास उद्धव ठाकरे तयार.. म्हणाले, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते केंद्रात सरकार बसले नसते
राज ठाकरेंनी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्टच सांगितले.
मी सोबत यायला तयार, पण माझी एक अट आहे. माझ्याकडून सर्व भांडणं मिटली. माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, हे आधी ठरवा, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
माझ्याकडून भांडणं नव्हती. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं सोडायला तयार आहे. पण त्याआधी भाजपसोब हित की माझ्यासोबत हे आधी ठरवा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाण्याची उद्धव यांनी अटी शर्थींसह तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
माझ्यासोबत युती करायची असेल तर शिंदे सेना आणि भाजपला सोडा, असे एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर अट घातली आहे. माझ्याकडून कोणताही भांडणं नव्हतीच, मी मिटवून टाकली. एकत्र यायचे असेल तर माझ्यासोबत हित आहे की भाजपसोबत हित आहे, हे आधी ठरवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठी माणसाने मराठीसाठी एकत्र यावे. पण माझी एक अट आहे. लोकसभेला सांगत होतो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग घेऊन जातात, तेव्हाच विरोध केला असता तर आज ते केंद्रात सरकार बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात बसले असते.
राज ठाकरे यांनी मुलाखत दिली अभिनेता , दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकरांना ….या मुलाखतीतून दिले संकेत ..
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव यांच्यासोबत युती करण्याचे सकारात्मक संकेत दिलेत. ‘महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद, भांडणे व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही,’ असे ते म्हणालेत.राज ठाकरे यांनी अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वॅको सॅनिटी या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर परखड भाष्य केले. यावेळी महेश मांजरेकर यांनी त्यांना एकेठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्न केला. त्यावर राज यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, ‘प्रश्न असा आहे की, कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद आमच्यातील भांडणे हे अत्यंत किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहेत.
त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही. पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे. हा माझ्या काही एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहिला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केले पाहिजे असे मला वाटते.’
महेश मांजरेकर यांनी यावेळी राज यांना एकत्र येणे शक्य नसेल तर तुम्ही शिंदे सेना अर्थात शिवसेना टेकओव्हर करण्यास हरकत नव्हती असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ‘मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की, शिंदेंचे बाहेर जाणे किंवा आमदार फुटणे हा राजकारणाचा एक वेगळा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा अनेक आमदार, खासदार माझ्याकडे आले होते. मला त्याचवेळी हे शक्य होते. पण माझ्या मनात एकच गोष्ट होती की, मी बाळासाहेब सोडले तर मी कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. त्यावेळची परिस्थिती अशी होती.
परंतु, मी शिवसेनेत होतो तेव्हा मला उद्धव सोबत काम करण्यास काहीही हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का मी त्याच्याबरोबर काम करावे, असे ते म्हणाले. त्यावर मांजरेकर यांनी अशी महाराष्ट्राची इच्छा असल्याचे सांगितले. त्यावर पुन्हा राज ठाकरे यांनी त्यांनी तसे महाराष्ट्राला सांगावे. मी अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये माझा इगो केव्हाच आणत नाही,’ असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी यावेळी मनसे आणि भाजप एकत्र येणे गरजेचे आहे का? या प्रश्नावरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘मी जे महाराष्ट्राविषयी किंवा मराठी माणसासाठी बोलू शकतो, करू शकतो, ज्या प्रकारचा सापळा तोडू शकतो. भाजपसोबत मी बरोबर येणे हे राजकीय होईल. परंतु सगळ्याच वेव्हलेंथ आमच्या जुळतील असे नाही. पण आता राजकारणात कोणत्या गोष्टी केव्हा घडतील हे काही सांगता येत नाही. उद्या आमच्याशी शेकहँडही केला जाईल. किंवा समोरासमोर येऊन हात जोडलेही जातील. कल्पना नाही. राजकारणात सर्वच गोष्टी बदलत असतात. आता तर इथे सर्वच गोष्टींना एवढा वेग आला आहे की, त्यात कधी कोणती गोष्ट होईल सांगता येत नाही.’

