मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? असा खडा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी नाशिक येथील दंगल जाणिवपूर्वक घडवण्यात आल्याचाही दावा केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नाशिक येथे जाणिवपूर्वक दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी वादग्रस्त अतिक्रमण काढण्याविषयी प्रशासनाला सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःच ते अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी ही सगळी मंडळी जी दंगलीमध्ये दिसत आहेत, त्यांनी जाणिवपूर्वक दंगल घडवली. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.
पत्रकारांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाणी टंचाईच्या मुद्यावरून सरकारवर केलेली टीका मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कोण संजय राऊत? असे म्हणत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पत्रकारांनी यवतमाळमध्ये पाणी टंचाईने एका 12 वर्षीय मुलीचा बळी घेतल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपुढे मांडला. त्यावर ते म्हणाले, जिथे टंचाई आहे, तिथे कलेक्टरला अधिकार दिलेत. कलेक्टरनी आपल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करायचा की तिथे उपलब्ध असणाऱ्या इतर पद्धतीने करायचाय याचा निर्णय घ्यायचा आहे.महाराष्ट्रात एप्रिल व मे या दोन महिन्यांत विविध भागांत पाणीटंचाई निर्माण होते. प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो. त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई निर्माण होते, तेथील उपाययोजना ठरवायच्या असतात. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीसुद्धा उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत हे समजून घेऊन त्यातून मार्ग काढू.
पत्रकारांनी यावेळी सदर घटना घडली त्या गावात 12 वर्षांपासून नळ योजना कार्यान्वित होऊनही नळाला पाणी नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मला या प्रकरणी आगाही माहिती नाही आणि पिच्छाही माहिती नाही. त्यामुळे मी यावर बोलू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुन्हा एकदा हिंदीचे जोरदार समर्थन केले. मी या प्रकरणी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा ही कंपलसरी आहे. ती अनिवार्य आहे. सर्वांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती ही शिकता येते. मला कधीकधी आश्चर्य वाटते की, हिंदीला विरोध व इंग्रजीला का नाही? इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? त्यामुळे मराठीला कुणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

