पुणे-गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेले दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास हे ससून रुग्णालयाच्या चौथ्या अहवालात मात्र निर्दोष ठरले आहेत.भिसे यांच्यावरील उपाचारात दीनानाथ रुग्णालय किंवा डॉ. घैसास यांनी कुठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. यानंतर पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे नव्याने अभिप्राय मागविला आहे.
गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापूर्वी भिसे यांना रक्तस्त्राव होत असल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही. त्यावेळी दीनानाथचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी नातेवाइकांकडे 10 लाख रुपयांची डीपॉझीट रकमेची लेखी मागणी केली. मात्र, नातेवाइकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. पण घैसास यांनी तनिषा यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे भिसे कुटुंबीय तेथून बाहेर पडले.
दीनानाथमध्ये उपचारांना उशीर झाल्यामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, असा ठपका यापूर्वीच्या आरोग्य संचालक यांच्या चौकशी समितीने ठेवला होता. याशिवाय धर्मादाय सह आयुक्तांच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयाने 35 कोटी 48 लाखांच्या धर्मादाय निधीचा वापरच केला नसल्याचे समोर आले होते. तर पुणे महापालिकेच्या माता मृत्यू समितीनेही वेळेत उपचार न मिळाल्याने मेंदूला प्राणवायुचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष या समितीने नोंदवला होता.यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे पत्र ससून रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार ससून रुग्णालयाने त्यासाठी चौकशी समिती तयार करून त्या मार्फेत तनिषा भिसे ज्या ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या त्या सर्व रुग्णालयांची चौकशी केली तसेच त्यांचे उपाचाराचे कागदपत्रे तपासली. यात महिलेच्या उपचारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय किंवा तेथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याबाबत उल्लेख नाही, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

