मुंबई- इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नको. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, ते दिसायला छान दिसत आहेत, पण त्यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला असा विकासही नको, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पण आता काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह मनसेने याविरोधात दंड थोपटल्यामुळे महाराष्ट्रात या मुद्यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी माणसांचे अस्तित्व संपवणारा विकास आम्हाला नको
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे. ते म्हणाले, आपल्याकडे शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणे खूप आवश्यक आहे. नुसते भाषा दिवस साजरा करणे किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणे याने मराठी राहणार नाही. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती नको आम्हाला. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, हे दिसायला छान दिसत आहे, पण यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपत असेल तर आम्हाला असा विकास नको.
आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी या शाळा आल्या. या शाळा देशभर सुरू झाल्या. यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. क्रांतीचा उगम म्हणतो आपण, त्यांचा इतिहास सांगता येत नाही. फ्रेंच रिव्हॉल्युशन शिकवता तुम्ही. त्याचे काय करायचे आहे? आपण इतिहासातून काय बोध घेतोय, ते शिकवणे जास्त गरजेचे आहे, असे राज ठाकरे या पॉडकास्टच्या प्रोमोत म्हणताना दिसून येत आहेत. महेश मांजरेकर यांनी हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी गुरुवारी एका पोस्टद्वारे महाराष्ट्रातील हिंदीकरणाला कडाडून विरोध केला होता. सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, असे ते म्हणाले होते.

