सोशल मीडियावर व्हिडिओमधून थेट CM आणि एसपींवर आरोप
पुणे- निलंबित झालेला पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले शरण आला नसतानाच त्याला पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. निलंबनानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून थेट मुख्यमंत्री आणि एसपींवर आरोप केले होते. वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी आपल्याला 50 कोटींची ऑफर मिळाल्याचा दावाही त्याने केला होता. त्यानंतर आपण शरण जाणार असल्याचेही त्याने म्हटले होते. मात्र, तो शरण आला नव्हता. अखेर कासले याला स्वारगेट येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले कालच पुण्यात दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मोठे दावे केले होते. मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दिले होते, असा दावा कासले यांनी केला आहे. तसेच एन्काउंटरची सर्व चर्चा बंद दाराआड झाली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते.
रणजित कासले काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, पुण्यात मी शरण जाण्यासाठीच आलो आहे. मी अजून 15 दिवस जरी गेलो असतो तरी मला कोणी पकडले नसते. परंतु मी माझ्या मित्रांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. बीडला जाऊन मी शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे. दिल्लीत असताना मी पबमध्ये, लाल किल्ल्यात सगळीकडे जाऊन आलो. दिल्लीत असताना मी केंद्र स्तरावर ईव्हीएमवर चर्चा केली आहे.
वाल्मीक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई येथे जात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपन्यातून माझ्या अकाउंटला दहा लाख आले त्यातले सात लाख साडेसातला परत केले उरलेल्या अडीच लाखात माझे जे काही आहे ते सगळं करतोय. हे जे अडीच खर्च करतोय ते सुद्धा मी प्रामाणिकपणे परत करणार आहे. हे पैसे ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी होते जे काही ईव्हीएमला छेडछाड होईल ते दूर राहून गप्प बसून बघत राहायचं यासाठी हे पैसे पाठवण्यात आले होते.
पुढे बोलताना रणजित कासले म्हणाले होते की, माझ्या खात्यात ईव्हीएम आणि धनंजय मुंडे यांच्यापासून दूर राहण्यासाठी पैसे दिले होते. कराडच्या एन्काऊंटरची चर्चा बंद दारामागे करण्यात आली होती. परळीमध्ये माझी आणि वाल्मीक कराडची भेट झाली होती. बोगस एनकाऊंटर म्हणजे काय तर मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत येऊन चर्चा करतात, त्यानंतर एनकाऊंटर केला जातो, जसा अक्षय शिंदेचा करण्यात आला. तसेच अतिरिक्त पोलिस अधिकारी कराडचे हस्तक असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. एडीजी निखिल गुप्ता यांनी मला सहा तासांच्या आत निलंबित केले. कारवाईचे पत्र यायला 48 तास लागतात. पण सहा तासांत माझी चौकशी केली आणि मला निलंबित केले. माझ्या सात वर्षांत एकूण सात बदल्या झाल्या आहेत. दोन वर्षांत माझ्या या बदल्या झाल्या आहेत. मला ज्युनिअर तुकाराम मुंडे करण्यात आले, असा दावा कासले यांनी केला होता.
पुणे पोलिसांनी संरक्षण देऊन बीड पोलिसांकडे सोपवावे अशी मागणी
बीडमधील निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले रात्री 9 वाजता पुण्यात येणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियातून जाहिर सांगितले होते. तसेच पुणे पोलिसांनी संरक्षण देऊन बीड पोलिसांकडे आपल्याला सोपवावे, अशी मागणी देखील रणजित कासले यांनी सोशल मीडियात या व्हिडिओच्या माध्यमातून केली होती.निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी गेल्या काही दिवसात व्हिडिओच्या माध्यमातून अनेक खळबळजनक आरोप केले होते. वाल्मीक कराडला मारण्याची सुपारी देखील आपल्याला देण्यात आली होती, असा दावा देखील रणजित कासले यांनी केला होता. याच सोबत धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले होते. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ शेअर करत रणजित कासले यांनी बीड पोलिसांना आपल्याला पकडून दाखवण्याचे ओपन चॅलेंज दिले होते. त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत आपण स्वतःहून पोलिसांना शरण येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, ते शरण आले नव्हते.
व्हिडिओमध्ये काय म्हणाले होते रणजित कासले?
रणजित कासले हे आता पोलिसांना शरण येणार आहेत. दिल्ली येथून विमानाने पुण्यात रात्री 9 वाजता पोहोचणार आहेत. रणजित कासले म्हणाले, मी दिल्ली एयरपोर्टला आहे आणि माझी फ्लाइट लेट झाली होती. सव्वा तीन वाजताची होती. पण ती आता पावणे सातची आहे. 9 वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो. मी एवढा वेळ खरे सांगत नव्हतो. परंतु आता आतमध्ये एंट्री झालेली आहे, चेकिंग झालेली आहे. बोर्डिंग पास घेतलेला आहे. अगोदरच बरोबर साम टीव्हीने ओळखले होते मला की मी दिल्लीमध्ये आहे. त्यांनी सकाळीच माझे लोकेशन पोलिसांना देऊन टाकले होते. तर येतोय मित्रांनो पुण्यात. जेव्हा येईल मी पुण्यात, तेव्हा अटक करा मला गुन्ह्यात. माझी एक विनंती प्रशासनाला व पोलिसांनाही की मला संरक्षण द्यावे आणि संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावे मला, ही माझी पुणे पोलिसांना विनंती आहे, असे ते म्हणाले होते. मात्र, त्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

