म्हणाले,’संपर्कसूत्रासाठी हिंदी शिकावी
मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे शैक्षणिक धोरण व त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या हिंदीच्या सक्तीचे जोरदार समर्थन केले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वांना आली पाहिजे. पण देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संपर्कसूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी शिकलीच पाहिजे, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पण आता मनसेसह मराठी भाषेसाठी लढणाऱ्या संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणाचे समर्थन केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण यापूर्वीच नवे शैक्षणिक धोरण लागू केले आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणताही नवा निर्णय घेण्यात आला नाही. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. हा आमचा आग्रह आहे. पण या देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषा हा एक पर्याय आहे. त्यामुळे लोकांनी ही भाषाही शिकावी असा आमचा प्रयत्न आहे.
कुणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्यांना इंग्रजी शिकता येईल. अन्य एखादी भाषा शिकायची असेल तर कोणतीही मनाई नाही. पण मराठी सर्वांना आली पाहिजे. तसेच आपल्या देशातील इतर भाषाही आल्या पाहिजेत. केंद्राने याविषयी विचार केला आहे. आपल्या देशात संपर्काची एक भाषा असावी असा केंद्राचा विचार आहे. त्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) पायाभूत स्तर व शालेय स्तर असे दोन राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केले आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या नेतृ्त्वातील सुकाणू समितीने या दोन्ही आराखड्यांना मान्यता दिली आहे.

