नदी सुधार काठ प्रकल्पाला बाणेर मधील स्थानिक नागरिकांचा विरोध.. वृक्ष तोड ताबडतोब थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा
मुळा नदी काठ उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाचे शिल्पकार कोण? व नदी काठावरील झाडे तोडल्यानंतर या परिसरातील जैवविविधतेच्या भाग असलेल्या लहान प्राणी, पक्षी, कीटक ज्यांचे पुनर्वसन कसे करणार व यांनी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पिंपरी : मुळा नदीच्या पात्रात हजारो ट्रक राडारोडा टाकून भराव टाकला जात आहे. पिंपळे निलख परिसरात मुळा नदीच्या काठावर असंख्य झाडांची कत्तल करण्यात आली आहे नदी सुधार या गोंडस नावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात विध्वंस केला जातो आहे. माणसांसाठी कोट्यावधी रुपये जिरवून नदी सुधार होईल ही परंतु या परिसरातील जैव विविधता अशी नष्ट करणार ? या बाबतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
विकास आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली मुळा नदी काठावर असलेली सोंडमाळ परिसरातील देवराईतील विविध 100 वर्ष जुनी झाडे आता तोडण्यात येतील. बाणेर बालेवाडी स्मार्ट सिटीच्या नावाखाली अगोदरच उध्वस्त झाली आहे. बाणेर बालेवाडी चे सिमेंटचे जंगल करण्यात आले आहे. तसेच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्याची ठिकाणी देखील पालिका, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या नावाखाली उध्वस्त केली जात आहेत.
नदीकाठ सुधार प्रकल्पा मुळे. बाणेर भागातील सोंडमळा येथील मुळा राम नदी देवराई तसेच तेथील जैवविविधता समूळ नष्ट होणार आहे. त्यामुळे तेथील स्थानिक निसर्ग प्रेमी सुधाकर धनकुडे, व निसर्गप्रेमी संस्था मध्ये कार्यरत असलेल्या वंदना चौधरी, शैलजा देशपांडे,अमेय जगताप मेघना भंडारी, सारंग वाबळे, बालेवाडी भागातून मोरेश्वर बालवडकर व आशिष कोटमकर यांनी पुढाकार घेत नदी काठची निसर्ग संपदा आणि पुराची समस्या कशी वाचेल यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यामुळे सदर भागात प्राचीन वृक्ष, दुर्मिळ पशुपक्षी तसेच ऐताहासिक मंदिरे आणि बांधकामे असल्याने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावा अशी मागणी संबंधित मंत्रालयास केलेली आहे त्यानुसार सर्वेक्षण करून अहवाल पाठवण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आलेले आहेत
राम नदी व मुळा नदी काठावरती शेकडो वर्ष जुनी असलेली हजारो झाडे, वेली, गवतं या परिसरामध्ये सिमेंटच्या जंगलातून स्थलांतर झालेल्या लहान प्राणी, पक्षी, कीटक यांचा अधिवास आहेत. नदी सुधार होत असताना यांचा विचार कसा केला जाणार
?असा प्रश्न पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारची योजना म्हणून नदी सुधार प्रकल्प हा नदी भवतालचे पर्यावरण उध्वस्त करून राबवला जात आहे. पुणे महापालिकेच्या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर तरी हा प्रकल्प थांबवला जाईल असे वाटत होते. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नदी काठ उध्वस्त करून नदीचा एक मोठा कॅनॉल तयार करण्याचा प्रकल्प असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. नागरिकांचा विरोध होत असताना नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग प्रकल्पाला विरोध करत असताना फारसा दिसत नाही. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खासदारांनी या प्रकल्पांबाबत या संवेदना व्यक्त कराव्यात तसेच पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या माध्यमातून होत असलेला विरोध केंद्रापर्यंत पोहोचवावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

