नाशिक- शहरातील कोठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत दर्गा काढण्याचे काम मध्यरात्री सुरू करण्यात आले. मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्या आधी रात्री उशिरा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराचा वापर केला. तर काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.
नाशिकच्या कोठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. यासाठी मागील महिन्यातच काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन देखील केले होते. त्यासाठी वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात देखील या संदर्भात सुनावणी झाली होती. उच्च न्यायालयात दर्ग्याच्या जागेबाबत दर्गा प्रशासनाला काहीही पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात दर्गा अनधिकृत ठरवण्यात आला होता. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वीच या दर्गा प्रशासनाला अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरी देखील दर्गा प्रशासनाने अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे अखेर प्रशासनाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
नाशिक पोलिसांकडून पंधरा दिवसांपूर्वीच अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम पाडण्याची नोटीस दर्गा प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, या दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस आणि महानगरपालिकेच्या वतीने संयुक्तपणे दर्गा हटवण्याची कारवाई करण्यात आली. त्यासाठी परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, रात्री उशिरा या परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास जमावाने अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांच्या हाताला आणि पायाला जखमा देखील झाल्या आहेत. परिस्थितीत नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले.

