पुणे-पिंपरी पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील वाहन साेडण्यासाठी पाेलिस उपनिरीक्षकांनी ४० हजार रुपयांची मागणी करुन तडजाेडीअंती ३० हजार रुपये घेऊन वाहन साेडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) सापळा रचून पाेलिस उपनिरीक्षक निलेश रमेश बाेकेफाेडे (वय- ३८) यांना रंगेहाथ अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाने पिंपरी पाेलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, यासंबंधी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासबंधीच्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्याविराेधात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदाराचे जप्त करण्यात आलेले वाहन साेडविण्यासाठी पाेलिस उपनिरीक्षक निलेश बाेकेफाेडे यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार, पाेलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांनी तक्रारीची पडताळणी केली असता, निलेश बाेकेफाेडे यांनी तक्रारदार यांना गुन्ह्यात मदत करण्याकरिता ४० हजार रुपये मागितल्याचे सिध्द झाले. तडजाेडीअंती ३० हजार रुपये घेताना एसीबीचे पथकाने पिंपरी पाेलिस स्टेशन अंकित माेहननगर पाेलीस चाैकीत सापळा रचून आराेपीला अटक केली. सदरची कारवाई पाेलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पाेलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली. काेणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फी व्यक्तिरिक्त सरकारी अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत तात्काळ एसीबीकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

