पुणे, दि. १६ एप्रिल २०२५: राजगुरुनगर विभाग अंतर्गत शेलपिंपळगाव ३३/२२ केव्ही उपकेंद्राने मानांकनाचे निकष पूर्ण करीत ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलातील ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळवणारे हे दहावे उपकेंद्र आहे. सोबतच शेलपिंपळगाव उपकेंद्रातील एका वीजवाहिनीचे विभाजन करून २२ केव्ही क्षमतेची नवीन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली.
शेलपिंपळगाव उपकेंद्रामध्ये मंगळवारी (दि. १६) आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नवीन काळूस २२ केव्ही वीजवाहिनी देखील श्री. पवार यांच्याहस्ते कार्यान्वित करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र येडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत गाडे, चाकणचे उपकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र गोरे आदींची उपस्थिती होती.
महावितरणच्या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व गुणवत्ता वाढीचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे चाकण उपविभागातील भोसे शाखे अंतर्गत शेलपिंपळगाव ३३/२२ केव्ही उपकेंद्रामध्ये गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात आली. २७ अटी व शर्तींच्या मानकांनुसार हे उपकेंद्र ‘आयएसओ’च्या मानांकनासाठी पात्र ठरले. या उपकेंद्राला ‘आयएसओ’चे मानांकन मिळवून देण्यासाठी सहायक अभियंता सुरेश माने, प्रधान यंत्रचालक राजेंद्र बिचकर, यंत्रचालक कोमल कांबळे यांनी योगदान दिले.
सोबतच या उपकेंद्रातील शेलपिंपळगाव २२ केव्ही गावठाण वीजवाहिनीचे विभाजन करण्यात आले आहे व नवीन काळूस २२ केव्ही वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे शेलपिंपळगाव, मोहितेवाडी, वडगाव, शेलगाव, भोसे, काळूस व दौंडकरवाडी या सात गावांतील ६ हजार १५८ वीजग्राहकांना आणखी सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.