आयएमडीचा नैऋत्य मान्सून हंगामी पावसाचा दीर्घकालीन अंदाज
±5% च्या फरकाने दीर्घकालीन सरासरीच्या 105% हंगामी पाऊस अपेक्षित
एनसो परिस्थिती तटस्थ, परंतु ला निना सारखा वातावरणीय आकृतिबंधही तटस्थ आढळला, संपूर्ण मान्सून हंगामात एनसो कायम राहण्याची शक्यता
ठळक मुद्दे
अ) 2025 मध्ये संपूर्ण देशभरात नैऋत्य मोसमी हंगामी पाऊस (जून ते सप्टेंबर) सामान्यपेक्षा जास्त (> दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) 104%) असण्याची शक्यता आहे. परिमाणात्मकदृष्ट्या संपूर्ण देशभरात हंगामी पाऊस सरासरीच्या 105% राहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये ± 5% प्रारूप त्रुटी अंतर्भूत आहे. 1971-2020 या कालावधीत संपूर्ण देशभरात हंगामी पावसाची दीर्घकालीन सरासरी 87 सेंमी आहे.
ब) सध्या विषुववृत्तीय प्रशांत प्रदेशावर तटस्थ एल निनो-दक्षिणी दोलन (एनसो) परिस्थिती दिसून येत आहे. तथापि, वातावरणीय परिसंचरण वैशिष्ट्ये ला निना परिस्थितीसारखीच आहेत. नवीनतम मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टम (एम एम सी एफ एस) तसेच इतर हवामान प्रारूप अंदाज असे दर्शवतात की मान्सून हंगामात तटस्थ एनसो स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
क) सध्या हिंदी महासागरावर तटस्थ हिंद महासागर द्विध्रुवीय (आय ओ डी) परिस्थिती आहे आणि नवीनतम हवामान प्रारूपाच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून हंगामात तटस्थ आय ओ डी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
ड) गेल्या तीन महिन्यांमध्ये (जानेवारी ते मार्च, 2025) उत्तर गोलार्ध आणि युरेशियामधील बर्फाच्छादित क्षेत्रे सामान्यपेक्षा कमी होती. उत्तर गोलार्ध आणि युरेशियामधील शीतकालीन तसेच वसंत ऋतूतील बर्फाच्छादित क्षेत्रांचा त्यानंतरच्या भारतीय उन्हाळी मान्सून पावसाशी व्यस्त संबंध आहे. आय एम डी मे 2025 च्या शेवटच्या आठवड्यात मान्सून हंगामातील पावसासाठी अद्यतनित अंदाज जारी करेल.