पुणे- सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या एका सराफ दुकानात तीन चोरटे मंगळवारी दुपारी हातात शस्त्र घेऊन शिरले. त्यांनी दुकानदाराला धमकावत दुकानातील २० ते २५ तोळे सोने जवळच्या पिशवीत टाकून पसार होताना दुकानदाराने विरोध केला असता, संबंधित पिस्टल हे खेळण्यातील असल्याचे ते तुटून खाली पडल्याने समजले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावर धायरी येथे रायकर मळा आहे. संबंधित ठिकाणी काळुबाई चौकात श्री सराफ ज्वेलर्स नावाचे दुकान असून दुकान मालक विष्णू सखाराम दहिवाल आणि कामगार दुकानात मंगळवारी होते. त्यावेळी दुपारी दुकानात वर्दळ कमी असताना, एक अनोळखी व्यक्ती दुकानात शिला. त्याने सोन्याची चैन दाखवा असे दुकान मालकास सांगितले. त्यानंतर दुकान मालक सोन्याची चैन दाखवत असतानाच, आणखी दोन अनोळखी व्यक्ती एकापाठोपाठ दुकानात आले. त्यांनी दुकानात शिरताच, पिस्तुलाचा धाक दाखवून दुकान मालक व कामगारास धमकावले. त्यानंतर दुकानातील २० ते २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांनी स्वत: जवळील पिशवीत टाकले. यावेळी दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्याशी हाताने मारहाण केली. पिस्टलचे बट ने चोरटे मारहाण करत असताना, ती तुटून खाली जमिनीवर पडली आणि ती खेळण्यातील बंदुक असल्याचे निष्पन्न झले. त्यानंतर घाईगडबडीत चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहे. याबाबतची घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी तीन दरोडेखोर यांच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून घटनास्थळी पोलिसांची पथके दाखल होऊन त्यांनी आरोपींचा माग काढणे सुरु केले आहे.