लठ्ठ असणं कुणालाच फारसं प्रिय नसतं. आपल्या लठ्ठपणाचा कॉम्प्लेक्स अनेकांना येत असतो.बारीक होण्याची धडपड. त्यासाठी चालणं, सायकलिंग, डाएटचे वेगवेगळे प्रकार, औषधं, जिम आणि बरंच काही… सुरु असतं. याच लठ्ठपणावर भाष्य करणार ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ यांची प्रस्तुती असलेलं एक ‘वजनदार’ नाटक रंगभूमीवर येऊ घातलं आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने मनोरंजनसृष्टीतआपल्या खणखणीत ‘वजनदार’ अभिनयाच ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल या नाटकाच्या निमित्ताने २७ वर्षांनी त्या पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत. एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या अलकाजी या नाटकाविषयी फारच उत्सुक आहेत. आपल्या कमबॅक विषयी बोलताना त्या सांगतात की, रंगभूमीवर मला काम करायचेच होते ‘वजनदार’ या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची उत्सुकता आहेच. माझी भूमिका प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वासही अलका यांनी व्यक्त केला.
‘वजनदार’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत त्या म्हणाल्या की, जरी २७ वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. मध्यंतरीच्या काळात चित्रपट, मालिका करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. वजनदार माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे.
वेगवेगळ्या सकस नाट्यकृती नाट्यरसिकांसाठी आणणाऱ्या ‘अष्टविनायक’ संस्थेने विप्रा क्रिएशन्स’ च्या साथीने आणलेल्या ‘वजनदार‘ नाट्यकृतीचा शुभारंभ येत्या २४ एप्रिलला यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे दुपारी ४.०० वा. होणार आहे. मनोरंजनसृष्टीतल्या दोन नावाजलेल्या गुणी अभिनेत्री संपदा कुलकणी-जोगळेकर आणि अलका कुबल ‘वजनदार’ नाटकाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. संपदा कुळकर्णी-जोगळेकर लिखित आणि संतोष वेरूळकर दिग्दर्शित या नाटकात अभिनेत्री अलका कुबल मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. अलका कुबल यांच्यासह अभिषेक देशमुख, साक्षी पाटील,अभय जोशी, पूनम सरोदे आदि कलाकार यात आहेत.
संध्या रोठे, प्रांजली मते, दिलीप जाधव यांनी ‘वजनदार‘ या नाटकाची निर्मिती केली आहे. संगीत मंदार देशपांडे यांचे आहे. नेपथ्य सचिन गावकर तर प्रकाश योजना अमोघ फडके यांची आहे. वेशभूषा हर्षदा बोरकर तर रंगभूषा कमलेश बिचे यांची आहे.