पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारून जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत ‘आरोग्य गणेशा’ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे २०२४-२५ आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे. यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल ७२ हजार ४८३ रुग्णांना करण्यात आली आहे. मागील वर्षी २०२३-२४ या वर्षात ४१ हजार ८७७ रुग्णांना मदत करण्यात आली होती, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले की, जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात ट्रस्टचे काम सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य विभाग सुरू करण्यात आला असून रुग्णांना सर्वतोपरी मदत होईल असा प्रयत्न करण्यात येतो. ट्रस्टची रुग्णवाहिका सेवा देखील सातत्याने सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून ससून येथे रुग्ण व नातेवाईकांना भोजन देखील मोफत दिले जाते.
महेश सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, हे अनेक रुग्णांना माहीत नसते. त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो. तसेच, ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील, त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरिता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे. वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध २२३ रुग्णालय आणि विविध संस्थांमधून ही सेवा दिली जात आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबीराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते.
- कर्णबधिर लहान मुलांच्या गुंतागुंतीच्या ८ शस्त्रक्रिया यशस्वी
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील जन्मत: कर्णबधिर असलेल्या वयवर्षे १ ते ४ मधील लहान मुलांच्या कॉक्लियर इम्प्लांट या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आल्या. या प्रत्येक शस्त्रक्रियेचा खर्च १२ लाख रुपये प्रत्येकी असून अशा ८ शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलच्या माध्यमातून या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. - मोफत महाआरोग्य शिबीर रविवारी (दि.२०)
जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत यंदा मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन रविवार, दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत करण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. यामध्ये ह्रदय आजार, कर्करोग, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबीर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामूल्य करून देण्यात येईल. नागरिकांसाठी वाहने पार्किंग व्यवस्था नू.म.वि. प्राथमिक शाळा, अप्पा बळवंत चौक येथे करण्यात आली आहे. -: सन २०२४-२५ वर्षातील आढावा :- - नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया – ३७,२२२
- दंत रोग उपचार – २३६४
- किडनी विषयक उपचार व शस्त्रक्रिया – २०८९
- कर्करोग शस्त्रक्रिया – १२३०
- लहान मुलांच्या शस्त्रक्रिया – ६७२
- ह्रदय शस्त्रक्रिया – ४२९
- अस्थिरोग शस्त्रक्रिया – १३३
- मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट – ९२७८
- मोफत फिजिओथेरपी – ७८३१
- श्रवणयंत्र व मोल्ड वाटप – ५१५०
- कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप – ३७४८
- एमआरआय, सिटी स्कॅन (५० टक्के सवलत) – २३३७
- ससून रुग्णालयात भोजनथाळी – १२ लाख रुग्ण
*श्रवणदोष असणा-या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र
श्रवणदोष असणाऱ्या गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्र मोल्ड व श्रवणयंत्र वाटप केले जाते. यावर्षी ५ हजार १५० कर्णबधिर मुले व नागरिकांनी याचा लाभ घेतला. ट्रस्टच्या वैद्यकीय विभागात आलेल्या नागरिकांना खुबा प्रत्यारोपण, गुडघा, प्रत्यारोपण आणि अस्थिरोग विषयक १३३ जणांच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. तसेच, किडनी स्टो, डायलिसिस, प्रोस्टेट ग्रंथी, पर्मकॅथ, फिस्तुला अशा २ हजार ८९ जणांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करून देण्यात आल्या आहेत.
*महाराष्ट्रातून आलेल्या लहान मुलांच्या विनामूल्य शस्त्रक्रिया
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या ६७२ लहान मुलांच्या ह्रदय, किडनी, कर्करोग व अन्य शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या गेल्या. तर, एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, मेमोग्राफी यासांरख्या महागड्या तपासण्यांवर ५० टक्के सवलतीच्या दरात २ हजार ३३७ रुग्णांना तपासण्या करून देण्यात आल्या आहेत.
दगडूशेठ ट्रस्टचे मोफत पॅथॉलॉजिकल टेस्ट सेंटर – ९ हजार २७८ रुग्णांच्या मोफत तपासण्या
पुण्यातील धनकवडी भागात काशिनाथ पाटील नगर येथे दगडूशेठ ट्रस्टचे मोफत रक्त व विविध प्रकारची रुग्ण तपासणी करणारे केंद्र आहे. याकेंद्रामध्ये दररोज किमान ५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी मोफत केली जाते. रक्त तपासणी व विविध तपासण्या अंतर्गत सीबीसी, रक्तगट, थायरॉइड, लिपिड प्रोइल, लिव्हर फंक्शन टेस्ट, फास्टींग पीपी शुगर, एसजीओटी/एस जी पीटी, युरिया, ईएस आर, युरीन, एच आयव्ही इत्यादी विविध प्रकारच्या तपासण्या विनामूल्य केल्या जात आहेत. वर्षभरात ९ हजार २७८ रुग्णांची रक्ततपासणी केली आहे.
मोफत फिजिओथेरपी, कृत्रिम अवयव व साहित्य वाटप, दंतरुग्णवाहिका सेवा
आरोग्य शिबीरात व ट्रस्टच्या वैद्यकीय विभागात आलेल्या अस्थिरोग आजार असलेल्या नागरिकांना मोफत फिजिओथेरपी, अॅक्युप्रेशर थेरपी, न्युरोथेरपी अशा आवश्यक थेरपी ७ हजार ८३१ रुग्णांना करून देण्यात आल्या. तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या ३ हजार ७४८ विकलांग व्यक्तीना मोफत कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप करण्यात आले. याशिवाय दंत रुग्णवाहिका द्वारे २ हजार ३६४ रुग्णांना दाढ काढणे, सिमेंट भरणे, रूट केनॉल, कवळी बसविणे असे उपचार विनामूल्य देण्यात आले आहेत.
प्रत्येक महिन्याला शहराच्या विविध भागात आरोग्य शिबिर
उत्सवाची पारंपारीक जागा असलेल्या बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे किंवा शहराच्या विविध भागात प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर आयोजित केले जाते. त्यामध्ये विविध रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची विनामूल्य तपासणी करुन आजाराचे रोग निदान करतात तसेच शिबिरात मोफत औषधोपचाराचे वाटप देखील करण्यात येते. दानपेटी आणि देणगीच्या माध्यमातून मंदिरात जमा होणारा समाजाचा पैसा, देवाचे सर्व धार्मिक उपक्रम करुन उरलेला निधी परत समाजाला देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून ट्रस्ट करीत आहे, यातून ट्रस्टने श्रध्देला सेवेची जोड दिलेली आहे.
तब्बल १३ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अखंडीतपणे विनामूल्य
ट्रस्टच्या एकूण १३ रुग्णवाहिका असून अखंडपणे २४ तास पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते. तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे. यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅनसह कार्डियाक रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळानिमित्त वारक-यांना ट्रस्टच्या रुग्णवाहिकाद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत वैद्यकिय सेवा औषधोपचार पुणे ते पंढरपूर वाटप केले जाते. तसेच पालखी सोहळा निमित्त वारक-यांसाठी जय गणेश प्रांगण येथे मोफत डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर देखील घेतले जाते.
ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे येथे वर्षभरात १२ लाख रुग्णांना मोफत भोजन
जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत राबविण्यात येणारे ससून सर्वोपचार रुग्णालयातील कार्य समाजाभिमुख आहे. यामध्ये वर्षभरात १२ लाख रुग्णांकरीता दररोजचे २ वेळचे भोजन,चहा आणि नाश्त्याची सोय केली जाते. रुग्णालयातील गरोदर महिलांच्या पाच वॉर्डाचे नूतनीकरण हा दगडूशेठ ट्रस्टच्या कार्यातील महत्वाचा टप्पा आहे. याशिवाय ५९ नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग आणि रुग्णांकरीता अतिदक्षता विभाग देखील अद्यावत करण्यात आला. गरोदर महिलांसाठी ५ कक्ष तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकरीता विश्रांती गृहाची व्यवस्था दगडूशेठ ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे.
गणेशोत्सव कार्यकाळात ४ बेडचे मोफत आयसीयू
गणेशोत्सवामध्ये येणा-या भाविकांची गर्दी पाहता दत्तमंदिर ते मुख्य गणपती मंदिरापर्यंत एकूण ४ वैद्यकिय मदत केंद्रांची व्यवस्था करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रात प्रथमच ४ बेडचे मोफत आयसीयू व २ कार्डियाक रुग्णवाहिका सुविधा देण्यात आली. त्यामध्ये विविध नामांकित रुग्णालयांमार्फत तातडीची वैद्यकिय मदत उपलब्ध करुन दिली जाते. यामध्ये केंद्रावर मोफत औषधोपचार, डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफ इत्यादी प्रकारची वैद्यकिय सुविधा दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी दिली जाते.