पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध योजनांची आखणी करत असतात. त्यांच्या ह्या दृष्टिकोणामुळेच ते लोकप्रिय झाले आहेत.विमानप्रवास हा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात यावा यासाठीच्या प्रयत्नांना यश आले आहे. मात्र ,विमानतळावर मिळणारे खाद्यपदार्थ खूप महागडे विक्री केले जात असून त्याचे दर सामान्य ठेवण्यासाठी विमानतळावर स्वस्त दरातील उडान यात्री कॅफे सुरु करावेत अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.तसेच विमानतळावरील प्रतीक्षा काळ कमी करणेसाठी नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र देखील पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
खर्डेकर म्हणाले, विमानतळावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. नुकतेच पुणे ते हैद्राबाद ह्या विमानप्रवासात ते प्रकर्षाने जाणवले. पुणे विमानतळावर वडापाव 120 रुपये, सामोसा 130 रुपये तर ब्रेड पॅटिस 150 रुपये ह्या हवाई दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चहा तर 200 रुपये च्या घरात आहे. ब्रँडेड दुकानामध्ये तर दर गगनाला भिडलेलेच आहेत. अगदी चितळेची बाकरवडी 800 रुपये किलो तर लक्ष्मीनारायण चिवडा 900 रुपये किलोने उपलब्ध होता.आपण ,नुकतेच कोलकाता विमानतळावरील उडान कॉफी शॉपला भेट दिली होती.जेथे स्वस्त दरात चहा,कॉफी, पाणी व इतर पदार्थ उपलब्ध आहेत. याच धर्तीवर सर्वच विमानतळावर उडान यात्री कॅफे सुरु केल्यास सामान्य प्रवासी यांना दिलासा मिळेल. किमान केंद्रीय हवाई नागरी राज्यमंत्री यांनी गृहनगर पुणे येथून ही सुविधा त्वरित सुरु करावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच प्रवाश्यांना विनाकारण तीन तीन तास आधीच विमानतळावर येण्यास सांगितलं जातं.त्यासाठी घरून विमानतळापर्यंतचा एक तास प्रवासाचा धरला तर अवघ्या अर्धा तास, किंवा 50 मिनिटांच्या प्रवासासाठी 4 तास प्रतीक्षा करावी लागते. हा कालावधी कमी करता आला तर योग्य होईल. त्यासाठी अधिकचे बॅगेज चेक इन कॉऊंटर व सुरक्षा तपासणी कॉऊंटर केल्यास लांबलचक रांगा व उड्डाणापूर्वीचा प्रतीक्षा कालावधी कमी करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.