नू. म. वि. प्रशाला, जय गणेश व्यासपीठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा उत्सवाचा, गाणी लावून नाचायचा दिवस नाही. कारण डॉ. आंबेडकर यांचे नाव मनात आले की, नैतिकता व बौद्धिकतेतून येणारा विवेकच समोर येतो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेण्यासाठी आत्मशोध घेणे आणि त्यातून आत्मसन्मान जागृत करणे आवश्यक आहे, असे परखड मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख व प्रसिद्ध लेखक, समीक्षक, वक्ते डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केले.
नू. म. वि. प्रशाला आणि जय गणेश व्यासपीठ आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त आज (दि. १४) नू. म. वि. प्रशालेतील केसकर सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. आंबेडकर यांच्या भव्य रांगोळीभोवती गणेश मंडळांचे कार्यकर्ते तसेच प्राध्यापक व शिक्षक यांनी संविधानातील भागाचे वाचन केले. त्या वेळी डॉ. मनोहर जाधव बोलत होते. नू. म. वि. प्रशाला शाला समितीचे अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शि. प्र. मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, सदस्य राजेंद्र कदम, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, जय गणेश व्यासपीठ चे समन्वयक पियूष शहा, नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया सोयाम, संगीता काळे, राजेश्री हेंद्रे, स्मिता कांगुणे आदी उपस्थित होते.
जय गणेश व्यासपीठ मधील साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, वीर शिवराज मित्र मंडळ, गुरुवार पेठ, एकता मित्र मंडळ, अरण्येश्र्वर, नवज्योत मित्र मंडळ, येरवडा, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ, कसबा पेठ, पोटसुळ्या मारुती मित्र मंडळ, गणेश पेठ, श्री शनि-मारुती बाल गणेश मंडळ, एरंडवणा, अष्टविनायक मित्र मंडळ, नवी पेठ, त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट, सोमवार पेठ, संयुक्त मित्र मंडळ, सदाशिव पेठ आणि संजीवनी मित्र मंडळ, सहकार नगर यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. मनोहर जाधव पुढे म्हणाले, अनेक आघाड्यांवर संघर्ष करत समाजव्यवस्था मार्गी लावण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी महान कार्य केले. त्यांनी शिक्षण घ्या एवढाच उपदेश न करता प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. महापुरुषांना जातीमध्ये बंदिस्त करणे अयोग्य आहे. जात हे समाजातील वास्तव असले तरी भेदभाव करणे अयोग्य आहे.
उमेश चव्हाण म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धर्मनिरपेक्षता दाखवत गणेश मंडळे एकत्र येऊन अभिवादन करत आहेत हे मोठे योगदान आहे. त्याग आणि समर्पणाच्या प्रत्येक व्याख्येत डॉ. बाबासाहेब यांचे नाव प्रकर्षाने पुढे येते.
पराग ठाकूर, महेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. नील महाजन, नेहा भिसे, श्रेया कदम या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तर बाळासाहेब खरात यांनी बुद्धवंदना सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या चाकणकर यांनी केले तर आभार पियूष शहा यांनी मानले.