सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटाचे अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चर्चा चांगलीच रंगली आहे. सामाजिक कुप्रथांवर आसूड ओढणारी आणि सामाजिक सौहार्दाची संस्कृती रुजवणारी कीर्तनकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. कीर्तनातून समाजप्रबोधन करण्याचं काम आजवर अनेक संतांनी आणि कीर्तनकारांनी केलं. आजच्या काळातही कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा हा वसा जपण्यासाठी साताऱ्याचे ह. भ. प. रामदास महाराज देसाई आपल्या कीर्तनातून समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करून गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं मोलाचं कार्य अखंडितपणे करतायेत.
सातारा जिल्ह्यातल्या वाघोली गावात वारकरी संप्रदायाचा इतका प्रसार झाला नव्हता. कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा फार कमी प्रमाणात व्हायचे. मोकळेपणानं बाहेर पडण्यासाठी महिलापण घाबरत असत. या गावात कीर्तनातून ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सांगून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या एक वर्षात वाघोली गावात परिवर्तन घडून आलं. कीर्तनामुळे हे शक्य झालं. २०१९मध्ये ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांनी श्रीराम वारकरी शिक्षणसंस्था उघडली. आज तिथे दीडशे मुलांचं शिक्षण ते स्वखर्चानं करतात. कीर्तन करून जे काही पैसे जमवता येतील त्यातून ते या मुलांचा सगळा खर्च करतात.
भगवान मामा कऱ्हाडकर यांच्याकडून कीर्तनाचे धडे घेणारं ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांचं संपूर्ण कुटुंब कीर्तनात आणि श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांच्या सेवेत मग्न आहे. आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या सहकार्यानं मी ही जबाबदारी पेलू शकतो असं ह. भ. प. रामदास महाराज देसाई सांगतात. त्यांची मुलगी संस्थेत संस्कृतचे पाठ शिकवते. मुलगा उत्तमरीत्या मृदंग वाजवतो. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची पूर्तता होणं आवश्यक आहे. माझे वर्षातून तीनशे ते चारशे कार्यक्रम होतात. माझ्या कीर्तनकलेची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते. यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं असं ह. भ. प. रामदास महाराज देसाई म्हणतात.
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा त्यांना अभिमान वाटतो आहे. त्यांची कीर्तनसेवा बुधवारच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाहायला विसरू नका साताऱ्यामधल्या वाघोली गावातल्या ह. भ. प. रामदास महाराज देसाई यांची कीर्तनसेवा ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमात सोमवार ते बुधवार, रात्री ८ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर…!