श्री शिवाजी मराठा सोसायटी लॉ कॉलेजच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज ६ वी राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धा २०२५
पनवेलचे भागुबाई चंगू ठाकूर महाविद्यालय विजेते तर पुण्याच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय ठरले उपविजेते
पुणे : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हे २५ ते ३० वर्षांपूर्वी जास्त प्रमाणात घेतले जात होते. मात्र, आता कायद्याच्या शिक्षणाकडे देखील वैद्यकीय आणि अभियांत्रिकीप्रमाणे पाहिले जात आहे. दररोज नवीन गोष्टी या क्षेत्रात शिकायला मिळत असून आपापल्या तालुक्यात व गावी जाऊन काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप मारणे यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज सहावी राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धा शुक्रवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, सुमंतराव कोल्हे, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष अॅड. अहमदखान पठाण आणि सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड. राजेंद्र उमाप, जिल्हा न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष अॅड. सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेशराव देसाई, अॅड. एन.डी. पाटील, प्रा. जयप्रकाश जगताप, बी.एम. गायकवाड, रघुनंदन जाधव, महादेव पवार, रविंद्र जेधे, ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी आशालता देशमुख, आणि नवनियुक्त न्यायाधीश स्नेहा थोरात उपस्थित होते.
या स्पर्धेत पनवेल येथील भागुबाई चंगू ठाकूर विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, तर पुण्याच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळवले. युगा कुमारी (श्री शिवाजी मराठा विधी महाविद्यालय) हिला सर्वोत्कृष्ट प्रतिवादी वकील तर श्रुती चौबे (भागुबाई चंगू ठाकूर महाविद्यालय) हिला सर्वोत्कृष्ट वादी वकील म्हणून गौरवण्यात आले.
संदीप मारणे म्हणाले, न्यायाधीशांसमोर खटला सादर करण्याची संधी अभिरूप न्यायालयाच्या माध्यमातून मिळत असते. विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास होण्यास यामुळे मदत होत आहे. कायद्याच्या क्षेत्रात काम करताना चिकाटी असणे गरजेचे आहे. यामध्ये काम करण्यास खूप वाव असून अभ्यास आणि व्यवहारिक ज्ञान मिळविण्यास सराव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शर्मिला देशमुख म्हणाल्या, कायद्याच्या क्षेत्रात कला आणि ज्ञान हे एकत्रित असणे गरजेचे आहे. न्यायाधीशांप्रमाणे त्या खुर्चीचा मान राखणे देखील कायद्याच्या क्षेत्रात आवश्यक आहे. या क्षेत्रात आपल्या वरिष्ठांकडून देखील विद्यार्थ्यानी शिकायला हवे. वकिली हा बिझनेस नसून एक प्रोफेशन आहे.
स्पर्धेतील पारितोषिक वितरण जिल्हा न्यायाधीश डब्ल्यू.के. कनबरकर आणि के.बी. कटके यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायाधीश म्हणून दीपक डोंगरे, शरद मडके, अॅड. नीलिमा वर्तक आणि प्रा. एस.एम. तांबोळी यांनी कामकाज पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत अॅड. एन.डी. पाटील यांनी केले. प्रा. सिद्धकला भावसार यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक केले आणि डॉ. अंजली गवळी यांनी आभार मानले. प्रा. मीनाक्षी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.