ठाणे -ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपीने नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली. आरोपी विशाल गवळीचा (३५) मृतदेह रविवारी सकाळी तुरुंगाच्या शौचालयात लटकलेल्या अवस्थेत सापडला, असे पोलिसांनी सांगितले. आम्हाला देवानेच न्याय दिला,अशी प्रतिक्रिया गवळीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीच्या पित्याने व्यक्त केली. यापूर्वी बदलापूर येथे चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाले होते. त्यात पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
गवळीवर डिसेंबर २०२४ मध्ये कल्याण येथे १२ वर्षीय मुलीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोप होता. मुलगी कोळसेवाडी परिसरातून गायब झाली होती आणि तिचा मृतदेह बापगाव येथे सापडला होता. पोलिसांनी गवळी आणि त्याची पत्नी साक्षीला अटक केली होती. त्यांच्यावर खंडणीसाठी अपहरण, बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. फेब्रुवारीत पोलिसांनी ९४८ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार गवळीने मुलीचा बलात्कार करून हत्या केली, तर साक्षीने मृतदेह लपवण्यात मदत केली होती.

