मुंबई-महात्मा फुले जयंतीदिनी स्त्री शिक्षणाचा इतिहास सांगताना उदयनराजे भोसले यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, असा दावा केला होता. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. ओबीसी नेत्यांनी उदयनराजेंच्या विधानावर टीका केली. आता अॅड. गुणरत्न सदातर्वे यांनीही उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. समोर येऊन इतिहास समजावून सांगावा किंवा माफी मागावी, असे सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांना म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील फुले वाड्याला भेट दिली होती. यावेळी महात्मा फुलेंच्या कार्याबाबत बोलताना त्यांनी फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते, असे वक्तव्य केले. यावरून आता गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली.
इतिहासाचा दाखला देताना अभ्यास करावा लागतो, संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात, साहित्याचे वाचन करावे लागते. इतिहास माहिती असावा लागतो, असेच सहज बोलून चालत नाही, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुलेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन पलटवार केला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास आज जगभरातील अनेक देशांतील विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. आपण कोणताही संदर्भ न देता थेट अनुकरण म्हणता. ‘अनुकरण’ या शब्दाचा संदर्भ त्यांना माहित आहे का? असा बोचरा सवाल सदावर्ते यांनी उदयनराजेंना केला.
एकतर तुम्ही उदार अंतःकरणाने समोर येऊन या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. कोण कुणाच्या घरात जन्माला आले हे महत्त्वाचे नसते. किती चिंतन झाले, किती अभ्यास झाला याच्यावर भाष्यकार होत असतात. अन्यथा खुलासा करणार नसाल तर ती तुमची एक चूक होती हे मान्य केले पाहिजे आणि त्यासाठी माफी मागितली पाहिजे, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
मनसेच्या भूमिकेवर बोलताना पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी संविधानाची भाषा ही हिंदी असल्याचे म्हटले. तसेच, मनसेकडून महाराष्ट्रातील 48 खासदारांचा धिक्कार करणे म्हणजे वैचारिक विकार असणे आहे. जे 48 खासदार मनसेसाठी उभे राहिले नाहीत, त्यांनी संविधानाचा विचार केला असावा. ज्यांनी संविधानाची बाजू घेतली नाही, त्यांना लाथाडले गेले. किती पदाधिकारी आणि नेत्यांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिकतात? असा सवालही सदावर्ते यांनी केला. हिंदी भाषेत जे बोलतात, ते संविधानाचीच भाषा बोलत आहेत. त्यामुळे, त्यांना कोणी थांबवू शकत नाही, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?
महात्मा फुले चांगले उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती गोळा केली, ती सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरिता खर्च केली. महात्मा फुले यांनी एकप्रकारे थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते. सर्वात आधी स्त्री शिक्षणासाठी शाळा कुणी सुरू केली असेल तर ती थोरल्या प्रतापसिंहांनी सातारच्या राजवाड्यात केली होती. ज्या राजवाड्यात शाळा सुरू करण्यात आली होती. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. समाजासाठी झटलेल्या महापुरुषांच्या स्मारकाचे जतन करणे आपल्या सर्वांचे काम आहे, असे उदयनराजे भोसले म्हणाले होते.