ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी श्रीराम सबनीस यांचा अमृत महोत्सव सत्कार
पुणे : आपल्या परंपरेत प्रयत्नवादाप्रमाणेच दैव या घटकालाही महत्त्वाचे स्थान दिलेले आढळते. अशा दैवाचा ज्योतिषशास्त्र हा नकाशा आहे. ज्योतिष हे एक प्रारूप (मॉडेल) आहे. लोकव्यवहारांचा अभ्यासक, संशोधक या भूमिकेतून ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक आहे, असे उद्गार संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
ज्योतिष परिषद आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. मोरे अध्यक्ष पदावरून बोलत होते. परिषदेचे संस्थापक सदस्य, ख्यातनाम शास्त्रज्ञ श्रीराम सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार मानपत्र प्रदान करून डॉ. मोरे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी ज्योतिष परिषद संस्थेचे अध्यक्ष ख्यातनाम ज्योतिषी व. दा. भट, ज्योतिषी चंद्रकांत शेवाळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर, निमंत्रक उमेश चाचर तसेच शुभदा सबनीस व्यासपीठावर उपस्थित होत्या.
डॉ. मोरे म्हणाले, “ज्योतिषशास्त्राविषयी मला कुतूहल आहे. मला विद्यापीठ अनुदान आयोगाची फेलोशिप मिळाली होती. तेव्हा अभ्यास संशोधनाच्या निमित्ताने श्रीकृष्णाची कुंडली, या विषयावर माहिती मिळाली. मला असलेल्या कुतूहलापोटी मी अभ्यास करत गेलो. त्यानंतर लोकमान्य टिळकांसह अनेक समाजधुरिणांच्या कुंडली अभ्यासल्या. महाराष्ट्रातील लोकव्यवहारांचा अभ्यास करताना, लोकमानसाचे दैनंदिन जीवन सुकर करण्यात साह्यभूत ठरत असलेल्या ज्योतिषाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनही बदलत गेला” , असे ते म्हणाले.
ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, भट सरांचे मार्गदर्शन मिळाल्याने मी ज्योतिषशास्त्राकडे सजगतेने पाहू लागलो. सबनीस सरांच्या व्यक्तिमत्वात शास्त्रज्ञ, ज्योतिष अभ्यासक आणि भक्त, यांचा संगम झाला आहे. ते व्रतस्थ अभ्यासक आहेत. ज्योतिषी म्हणून ते मानवसेवा करत आहेत. शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी देशसेवा केली आहे आणि संतसाहित्याच्या अभ्यासातून ते ईश्वरसेवा करत आहेत. त्यांच्या सन्मानाच्या कार्यक्रमात सहभागी होणे आनंददायक आहे.
सत्काराला उत्तर देताना सबनीस म्हणाले, “माझ्या पत्रिकेत गुरूयोग उत्तम आहे, याची प्रचिती मी घेतली आहे. ज्योतिषशास्त्रामुळे मला लोकसंग्रहाची संधी मिळाली. भट सरांच्या पुस्तकांचे स्थान शिक्षणातील बाराखडी व अंकलिपीप्रमाणे मूलभूत स्वरुपाचे आहे. त्यामुळेच गेली 60 वर्षे हे पुस्तक लोकप्रिय ठरले आहे. उद्याविषयीचे कुतूहल हे मानवप्राण्याचे वेगळेपण आहे आणि ते जोवर आहे, तोवर ज्योतिष टिकून राहील“.
सबनीस यांचे स्नेही जयंत पेशवे, वरद खांबेटे, श्रीराम भट यांनी मनोगत व्यक्त केले.
सप्तमस्थान पुस्तकाच्या प्रकाशक सुमेधा तुपे म्हणाल्या, नव्या पिढीशी नाळ जोडण्यासाठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आवश्यक वाटला. मूळ पुस्तक मराठी भाषेत आहे, पण त्यातील ज्ञान सीमित राहू नये, या उद्देशाने इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात व. दा. भट लिखित कुंडली तंत्र आणि मंत्र (भाग 1 व 2) या पुस्तकाच्या प्रकाशनाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कौतुक समारंभाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच व. दा. भट लिखित सप्तमस्थान या पुस्तकाच्या सेव्हन्थ हाऊस या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशनही कऱण्यात आले. ज्योतिष परिषदेतर्फे काही विद्यार्थ्यांना पदवीप्रदानही करण्यात आले. मंदार बापट यांनी सूत्रसंचालन केले.