मुंबई, दि. १३ एप्रिल २०२५:
ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील ‘पसायदान’ नावाच्या संस्थेत लहान मुलांवर कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणावरून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात संबंधित संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे असा दावा करणाऱ्या संस्थेकडून घोर दुर्लक्ष झाल्याने पीडित मुलांवर मानसिक व शारीरिक अत्याचार झाले, असे उपसभापतींनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
उपसभापती गो-हे यांनी पुढील मागण्या केल्या आहेत:
• दोषींवर POCSO कायदा, JJ Act आणि IPC अंतर्गत कठोर कारवाई करावी
• प्रकरणी निष्णात वकिलांची नेमणूक करून न्यायप्रक्रियेला गती द्यावी
• उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती गठीत करावी
• संस्थेची धर्मादाय कायद्याच्या अनुसार नोंदणी रद्द करावी
• पीडित बालकांसाठी समुपदेशन व पुनर्वसनाची विशेष व्यवस्था करावी
• राज्यभरात बेकायदेशीर बाल वसतिगृहांविरोधात मोहीम राबवावी
उपसभापतींनी याआधीही अशा घटनांवर सातत्याने निवेदने दिली असून, तरीही शासनाकडून ठोस पावले उचलली न गेल्याची खंत व्यक्त केली आहे. कळंबोली येथील प्रकरणात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“बालकांच्या मूलभूत हक्कांवर आघात करणाऱ्या अशा घटनांवर सरकारने कठोर भूमिका घेऊन आदर्श निर्माण करावा,” अशी मागणी उपसभापती नीलम गो-हे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

