पुणे, दि. १२: ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येरवडा येथे महिला मेळावा आणि आरोग्य शिबिराचे आज आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनाबाई मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या गृहपाल श्रीमती सुक्षाला शेलार होत्या. प्रमुख पाहुणे व वक्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील युवा व्याख्याते सागर सोनकांबळे, समर्थ सोशल अँड वेलफेअर फाउंडेशनचे आरोग्य सल्लागार निवास पोवार, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी इंदल चव्हाण, कार्यालय अधीक्षक संतोष होगाडे आदी उपस्थित होते.
श्री. सोनकांबळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. मनुस्मृतीने नाकारलेले सर्व अधिकार महिलांना मिळवून देण्यासाठी १९१९ पासून महिलांना मतांचा अधिकार, अस्पृश्यता निवारण, ग्रंथ लिखाण, स्थानिक प्रश्नानुसार लिखाण, कामगारांच्या न्यायासाठी काम, महिलांचे अधिकार, शिक्षण, महिलांसाठी कायदे, महिला आयोगाची स्थापना, विषमतेला छेद देणारे कायदे, चवदार तळे सत्याग्रहामध्ये प्रत्येक घरातून किमान एक महिला उपस्थित रहावी यासाठी आग्रही डॉ. आंबेडकर राहिले.
संविधानात कलम ३५६ आणिबाणी कायदा निर्माण करून भारत एकसंघ ठेवला, कलम १४ मध्ये समतेचा अधिकार दिला, कलम १५ जात, धर्म, भाषा यावरुन भेदभाव निर्माण होऊ नये म्हणून कायदा केला असून डॉ. बाबासाहेबांच्या या कार्यातून समाज उत्थानाचे मौलिक कार्य घडले असल्याचे नमूद केले.
दुपारच्या सत्रामध्ये निवास पवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व सल्ले दिले. त्यानंतर उपस्थित महिला, विद्यार्थीनी तसेच कर्मचारी वृंदांची आरोग्य तपासणी करण्यात आली, अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार यांनी दिली आहे.

