मुंबई-अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावर अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले. त्यामुळे आता मुंबईत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णायक चर्चा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे नाराज झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही नावांना स्थगिती दिली. रायगडमध्ये शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातच काल अमित शहा हे रायगडला पोहोचल्यानंतर थेट सुनील तटकरे यांच्या घरी गेल्याने विविध चर्चांना उधाण आले. भरत गोगावले यांना तटकरे यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण असताना देखील त्यांनी दांडी मारली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी अमित शहा यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुणीही नव्हते. विशेष म्हणजे या भेटीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित नव्हते. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावून घेतले. अमित शाह यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांना काही संदेश दिला असावा का? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एकनाथ शिंदेंनी तातडीने मुंबईला बोलावण्याबाबत भरत गोगावले यांना विचारले असता, पक्षाच्या कामासाठी शिंदेंनी बोलावले आहे. पक्षाच्या काही गोष्टी असतात, शेवटी पक्षबांधणी आणि पक्ष वाढवणे महत्वाचे आहे आणि जी काही जबाबदारी आमच्यावर दिली आहे ती आम्हाला पार पाडायची आहे, असे भरत गोगावले म्हणाले.
अमित शाह आणि सुनील तटकरे यांच्यात जेवणावेळी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली आहे का, असा प्रश्न भरत गोगावले यांना विचारला असता, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. परंतु आम्ही काल त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना यासंदर्भात चर्चा झाली का, असे विचारले असता अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनील तटकरे यांच्या सुतार वाडीतील निवासस्थानी काल अमित शहा यांच्यासोबत फक्त फोटोसेशन आणि भोजनाव्यतिरिक काहीच झाले नाही. सुनील तटकरे यांनी अमित शहा यांना दिल्लीत माझे घर तुमच्या रायगड दौऱ्यावेळी रस्त्यात लागेल. त्यामुळे तुम्ही तिकडे या, असे निमंत्रण दिले होते. त्यामुळे त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन अमित शहा काल सुतारवाडीत गेले, असा दावा भरत गोगावले यांनी केला.