रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फे सुधाकर कदम यांचा गझलमित्र पुरस्काराने सन्मान
पुणे : मराठी गझलकाराने सौंदर्याची उपासना करावी. धक्कातंत्र अथवा चिमटा काढण्याच्या प्रेमात न पडता आशय व्यक्त करण्याची क्लृप्ती साधणे आवश्यक आहे. शब्दांचे गारुड किती प्रमाणात पसरावे याचे भानही कवीला असणे आवश्यक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांनी व्यक्त केले. उच्चकोटीचे शब्दखेळ करण्याची क्षमता ओळखून चिंतन होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 13) आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गझल संमेलनात गझलगंधर्व सुधाकर कदम यांचा गझलमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण सासणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन मंचावर होते. सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य केले जात आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवी-गझलकारांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून ही बौद्धिक मेजवानीच ठरणार आहे.
उपक्रमाविषयी माहिती देऊन भूषण कटककर म्हणाले, गझल ही आत्ममग्नतेतून आविष्कृत व्हायला हवी. आस्वादकाच्या अभिरुचीवर गझलेची निर्मिती विसंबून नसावी. रसिकांची दाद हा फक्त दृश्य परिणाम आहे. प्रत्यक्षात गझल लिहून झाल्यावर कवीला कोणत्यातरी व्यथेपासून सुटका झाल्यासारखे वाटायला हवे.
भारत सासणे पुढे म्हणाले, कवीला भाषेचे, शब्दांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. विरामचिन्हांची ताकद ओळखून त्यांचा प्रभावी वापर केल्यास काव्यातून अथवा गझलेतून अपेक्षित अर्थ प्रवाहित होतो; शब्दांच्या पलिकडील आशय प्रकट होतो. कवीला वाट पाहण्याची तयारी हवी. त्याने आत्ममग्न राहून लिहिते राहण्याची साधना साधणे गरजेचे आहे. सातत्याने साधना केल्यानंतर कवी पक्व होतो आणि त्याच्या काव्यातून आनंदनिर्मिती होते आणि उत्तम काव्य अथवा गझल प्रकट होते. या उपक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील कवी, गझलकार एकत्र आल्याने वैचारिक आदान-प्रदान होण्यास मदत होईल.
सत्काराला उत्तर देताना सुधाकर कदम म्हणाले, माझ्या आयुष्यात अनेक योगायोग आले. गझलमित्र पुरस्काराने झालेला सन्मान माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. कवी सुरेश भट यांच्या भेटीतून आपली काव्यप्रतिभा फुलत गेली. माझ्या कलेला स्वीकारले हे रसिकांचे मोठेपणच आहे. काव्य-गझल आणि संगीत क्षेत्रातील प्रवास त्यांनी उलगडला.
सुरुवातीस गझलकारा सुप्रिया जाधव, गझलकार सतिश दराडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा परिचय वैजयंती आपटे यांनी करून दिला तर सन्मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. गझल संमेलनाच्या यशस्वीतेसाठी वैशाली माळी, निरुपमा महाजन, मुक्ता भुजबले, वासंती वैद्य यांनी प्रयत्न केले.