पुणे: पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी व अपघातांच्या लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत होते. या परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या बीआरटी मार्गिका काढण्याच्या वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. अनेक स्तरांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर काल (ता. १२) उशिरा रात्री सोमनाथ नगर चौक, खराडी बायपास व आपले घर या भागातील बीआरटी मार्गिका हटवण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे-नगर रस्त्यावर बीआरटी मार्गिकेमुळे वर्षानुवर्षे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार बापूसाहेब पठारे यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हणाले, “नागरिक बांधवांनी गेल्या कित्येक वर्षांत अनुभवलेल्या असुविधा, अपघात, खोळंबा तसेच रोजच्या प्रवासातील नाहक त्रासातून मिळालेली मुक्तता आहे. मी अनेकदा बीआरटीबाबतचा मुद्दा विविध ठिकाणी मांडला, सभागृहात प्रश्न उपस्थित केला, प्रशासनासोबत बैठका घेतल्या. अखेर पाठपुराव्याला यश आले आहे. विकासाच्या संकल्पनेत माणूस केंद्रस्थानी असावा, ही माझी भूमिका आहे. वडगावशेरी मतदारसंघात होणारी वाहतूक कोंडी पूर्णतः नाहीशी करण्यासाठी मी कायमच विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे.”
महानगरपालिकेच्या झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत गेल्या आठवड्यात (ता. ९) बीआरटी काढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पोलीस विभागाच्या मागणीनुसार बीआरटी मार्गिका काढून तिथे यू टर्न सुविधेची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कामे हाती घेण्यात येणार आहेत.
पुणे-नगर रस्त्यावरील नागरिक, वाहनचालक व व्यवसायिक यांना या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. सदर कामामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.