गीतेच्या सखोल संशोधनातून साकारलेल्या १६ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा : रामसुख अप्लाईड श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजन
पुणे : आजच्या सभ्यतेचा मोठा प्रश्न म्हणजे ‘अधिकाराची भावना’. आपण एक ‘अधिकार प्रदान करणारा देश’ झालो आहोत. ‘हमारी मांगे पुरी करो, चाहे जो मजबुरी हो’, हे लोकांचे ब्रीद झाले आहे. पण हे भारताचे खरे स्वरूप नाही. पूर्वीचा भारत कर्तव्य भाव असणारा देश होता. स्वतःचे कर्तव्य हीच प्राथमिकता मानणारा समाज होता. हीच ‘कर्तव्यभावना’ भगवद्गीता आपल्याला शिकवते, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी व्यक्त केले.
श्रीमद् भगवद्गीतेच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक पैलूंवर आधारित सखोल संशोधनातून निर्माण झालेल्या १६ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रामसुख अप्लाईड श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला. प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आलोक कुमार उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संस्थेचे संस्थापक प्रल्हाद राठी तसेच सहप्रार्थी म्हणून प्रा. डॉ. मुकुंद दातार, संजय मुद्राळे, महेश पोहनेरकर, अजिंक्य कुलकर्णी, संजय भोसले, डॉ. सुनंदा राठी, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होते.
आलोक कुमार म्हणाले, गीता केवळ एक ग्रंथ नसून त्यात जगण्याची कला शिकवणारी मार्गदर्शक तत्वे आहेत. तिच्या प्रत्येक श्लोकातून आपल्याला आयुष्य कसे जगावे हे शिकायला मिळते. जीवनाच्या प्रत्येक भागात ती आपल्याला जागृत करते, ज्याने मनुष्य देवत्वाला प्राप्त होते. भगवंत हे आपल्या जीवनाचे सारथी आहेत.
या १६ पुस्तकांमध्ये अन्न सेवा, त्रिगुण, विवेक, बहि:करण, अंत:करण आणि स्व, आसक्ती, चिंता, सवय, स्वभाव, नातेसंबंध आणि पालकत्व, अध्ययनपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्य, कामना, प्रबोधन, सामाजिक सुधारणा, नेतृत्व, मानसशास्त्र यांसारख्या विविध विषयांचा समावेश आहे. याशिवाय प्रल्हाद राठी यांच्या वैविध्यपूर्ण लेखांचे संकलन असलेले ब्राह्ममुहूर्त हे पुस्तकही यावेळी प्रकाशित झाले. आनंद मानधनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रल्हाद राठी यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.