श्री देवदेवेश्वर संस्थान ,सारसबाग पर्वती व कोथरुड तर्फे आयोजन; पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे: महाराष्ट्रात दोनशे वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात ‘मल्लखांब’ या पारंपरिक क्रीडा प्रकाराचा उगम झाला. मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. हाच पारंपरिक खेळ जोपासण्यासाठी श्री देवदेवेश्वर संस्थान , सारसबाग,पर्वती व कोथरुडच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून पर्वती पायथ्याशी असलेल्या रमणा गणपती मंदिराच्या आवारात आणि श्री वेताळ बाबा मंदिराच्या प्रांगणामध्ये मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे.
संस्थानचे विश्वस्त पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती सचिव मोहन झुंजे पाटील, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे उपाध्यक्ष विकास फाटक, सचिव सचिन परदेशी, प्रशिक्षक जितेंद्र खरे, श्री वेताळ बाबा मंदिराचे अध्यक्ष किशोर ठाकूर , आनंद भाटी , अमोल हुंबरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. हा प्रशिक्षण वर्ग मोफत असून दररोज सकाळी व सायंकाळी घेतला जाणार आहे.
रमेश भागवत म्हणाले, मल्लखांब हा कमीत कमी वेळेत शरीरातील जास्तीत जास्त भागांना व्यायाम देणारा खेळ असून मल्लखांबामुळे एकाग्रता, मनाचा कणखरपणा, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, आकलन क्षमता वाढण्यास मदत होते. तळागाळात मल्लखांब पोहोचणे तसेच इतर मराठी खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संस्थानच्यावतीने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

