पुणे -शहराची लोकसंख्या पाहता पुण्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सुसज्ज अशी जागा उपलब्ध करून वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीसाठी पुणेकरांना होणारा नाहक त्रास दूर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
दीपक मानकर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, पुणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणी ही यापूर्वी विश्रांतवाडी रोड येथील कार्यलयात होत असे. मात्र आता चाचणी केंद्र बदलले असून पुणे शहरातील नागरिकांसाठी वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीचे असलेले केंद्र आता कासारवाडी आयडीटीआरला जोडले गेले आहे. मात्र यामुळे प्रामुख्याने अर्जदारांचा संपूर्ण दिवस वाया जात आहे. पुणे शहराच्या एका टोकापासून कासारवाडी असे कमीत-कमी ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास अर्जदाराला करावा लागत आहे. या दरम्यान तो त्रास वाचावा यासाठी पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी चाचणी घ्यावी, अशी मागणी पुणे शहरातील वाहन चालक परवाना अर्जदार करीत असून होणारे हेलपाटे कमी व्हावे, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुणे शहरातील नागरिकांसाठी चाचणी केंद्र ठिकाण बदल्या गेल्या असल्याबाबत अद्यापही अनेक अर्जदारांपर्यंत ही माहिती पोहचलेली नाही. पुढे ते म्हणाले, पुणे शहराच्या एका टोकापासून वाहन चाचणी घेण्यासाठी अर्जदार नेहमीप्रमाणे विश्रांतवाडी येथील आरटीओ कार्यालयात जातो मात्र हे चाचणी केंद्र हलवण्यात आल्याचे तेथे गेल्यावर अर्जदारास कळते. मग त्याला तेथून पुन्हा कासारवाडी येथील आयडीटीआर कार्यालयामध्ये जाण्यास सांगितले जाते. त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैशाचा देखील अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विश्रांतवाडी येथे अर्जदार आला की त्याला पुन्हा तेथून कासारवाडी या ठिकाणी जाण्याची वेळ येते. तर कागदपत्रांची पूर्तता व प्रक्रियेसाठी पुन्हा विश्रांतवाडी येथील आरटीओ कार्यालयात जावे लागते. कागदपत्रांची पूर्तता झाल्यांनतर विश्रांतवाडी येथून पुन्हा आयडीटीआर, कासारवाडी मध्ये पोहोचावे लागते. अशाप्रकारे अर्जदारांना एकाच दिवशी हेलपाटे मारावे लागतात. परिणामी, त्यांचा संपूर्ण दिवस या कामासाठी लागत आहे. त्यामुळे पुणे शहराची लोकसंख्या पाहता पुण्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सुसज्ज अशी जागा उपलब्ध झाल्यास वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणी होण्यासाठी पुणेकरांना होणारा नाहक त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते, अशी पत्राद्वारे विनंती केलेली आहे.
पुणेकरांना वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीसाठी मारावे लागणारे हेलपाटे थांबवा -दीपक मानकर यांची मागणी
Date: