मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड किल्ल्यावर बोलताना मुघल बादशहा औरंगजेब याच्या खुलताबाद येथील कबरीचा उल्लेख समाधी म्हणून केला. त्यांच्या या ‘स्लिप ऑफ टंग’चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला. समाधी ही साधूसंत पुण्यवंतांची असते. त्यामु्ळे छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस आमच्यावर आले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना किल्ले रायगडावर जाऊन अभिवादन केले. यावेळी बोलताना अमित शहा यांनी औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख समाधी असा केला. माता जिजाऊंनी बाल शिवाजींवर संस्कार केले. शिवाजी महाराजांनी या संस्काराचा वटवृक्ष उभा केला. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी आदी अनेक योद्धे शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब जोपर्यंत जिवंत राहिला तोपर्यंत त्याच्याशी लढत राहिले, झुंजत राहिले.
यामुळे स्वतःला आलमगीर म्हणवून घेणारा व्यक्ती महाराष्ट्रात पराभूत झाला. त्याची इथेच समाधी बनली. हे शिवचरित्र भारताच्या प्रत्येक मुलाला शिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे अमित शहा म्हणाले.
समाधी ही साधूसंत पुण्यवंतांची असते
अमित शहा यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एका ट्विटद्वारे त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. अमित शाह जी इथल्या लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करताना तरी मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रथा परंपरांबद्दल माहीत नसताना व्यक्त होणे टाळा. समाधी साधूसंत पुण्यवंताची असते. ज्याबद्दल बोलताय त्याला आम्ही “समाधी” नाही ‘थडगे” म्हणतो. छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस आले नाहीत, असे त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी, आपल्या भाषणात अमित शहा यांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता जगभरात पोहोचवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मी महाराष्ट्रातील लोकांना हात जोडून विनंती करतो की, शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. त्यांच्यापासून संपूर्ण देश व जग प्रेरणा घेऊ शकते. स्वधर्म, स्वराज्य व स्वभाषा अमर करणे हे 3 विचार देशाच्या सीमेशी जोडलेले नाहीत. ते माणसाच्या स्वाभीमानाशी जोडलेले आहेत. आक्रमण करणाऱ्यांनी आपल्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवरायांनी हा विचार मांडला. आपण गुलामगिरीच्या मानसिकतेत गेलो. पण शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा सूर्य दैदिप्यमान केला. मी इथे भाषण करायला किंवा राजकारण करायला आलो नाही. मला शिवरायांच्या स्मृतींची अनुभूती व्हावी म्हणून येथे आलो आहे.
छत्रपतींचा राज्याभिषेक झाला तो हाच रायगड किल्ला. याच किल्ल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही पवित्र भूमी आपल्याला इतिहास सांगणारी आहे. इंग्रजांनी रायगड किल्ला जाणीवपूर्वक तोडण्याचे काम केले. कारण हा किल्ला वर्षानुवर्षे स्वराज्याचे प्रतीक होता. दीर्घ काळ गुलामीत ठेवण्यासाठी हे प्रतीक तोडण्यात आले. पण लोकमान्य टिळकांनी या स्मारकासाठी कष्ट घेतले. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा नाराही दिला. त्यांनी शिवरायांचीच प्रेरणा घेतली होती, असे अमित शहा म्हणाले.