सिंधुदुर्ग-नारायण राणे यांना अटक करतानाचा व्हिडिओ अजूनही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. ज्या दिवशी मी याची परतफेड करेन, त्याच दिवशी मी तो व्हिडिओ डिलीट करेन. मी कुणालाही सोडणार नाही, असा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांना दिला.खासदार नारायण राणे यांचा गुरुवारी सिंधुदुर्गमध्ये काल वाढदिवस झाला. या कार्यक्रमाला महायुतीचे नेते उपस्थित होते. मंत्री नीतेश राणे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या काळात नारायण राणे यांना झालेल्या अटकेवर भाष्य करताना ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा दिला. ते म्हणाले, साहेबांना जेवणाच्या ताटावरून उठवले आणि अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला हा क्षण मी अजूनही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी मी त्याची परतफेड करेन त्या दिवशीच हा व्हिडिओ डिलीट करेन. सर्वांचा हिशोब होणार आहे. कारण, राणे साहेबांना ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटणार नाहीत हे मी विश्वासाने सांगतो.
आम्ही 10 वर्षांच्या प्रवासात खूप काही पाहिले. अनुभवले. दीपक केसरकर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री होते. त्यांच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेलही पाहिले. पण त्यांनी आम्हाला लोकसभेला साथ दिली. त्यामुळे जुन्या आठवणी पुसल्या गेल्या. तिसऱ्या कुणालातरी खुश करण्यासाठी केसकरांनी ते केले होते. आमचे त्यांच्याशी केव्हाच वैर नव्हते, असेही नीतेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे दिशा सालियन प्रकरणात अडचणीत सापडलेत. सत्ताधारी महायुतीच्या अनेक नेत्यांना त्यांना या प्रकरणात अटक होण्याची भिती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी ठाकरे गटाला हा इशारा दिला आहे.
नारायण राणे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. स्वातंत्र्य दिनाविषयी ज्यांना काही माहिती नाही, त्यांनी फार काही बोलू नये. त्यांना स्वातंत्र्य दिन कोणता याची काहीही माहिती नाही. मी असतो, तर त्या दिवशी कानशिलात हाणली असती, असे ते महाड येथील एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले असते.
नारायण राणे यांच्या या विधानाने राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. या विधानानंतर काही दिवसांतच 23 ऑगस्ट 2021 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांना अक्षरशः जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली होती.