सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात ‘महा कुंभ प्रयागराज’ या विषयावर व्याख्यान
पुणे : समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृतकुंभाचे चार थेंब पृथ्वीवरील चार ठिकाणी पडले. या ठिकाणी म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो. कुंभमेळा हे सनातन धर्माचे सर्वोच्च प्रतीक आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार, ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थानचे प्रमुख निरंजननाथ महाराज यांनी व्यक्त केले.
सद्गुरु श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवात “प्रयागराज कुंभमेळा” या विषयावर निरंजननाथ महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष राजेंद्र तांबेकर यांनी निरंजननाथ महाराज यांचे स्वागत केले.
निरंजननाथ महाराज म्हणाले, वर्षभर देवासमोर कधीही अगरबत्ती न लावणारे सुद्धा यंदा प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्याला जाऊन आले. त्यांच्या मनात भक्तीभाव नव्हता, परंतु मोबाईलमध्ये अडकलेल्या आजच्या पिढीला त्या ठिकाणी जाऊन स्वतःचे फोटो सोशल मीडियावर टाकायचे होते. मात्र, ही खरी भक्ती नाही.
प्रत्यक्ष जगाचे भान हरवलेल्या आजच्या पिढीला सोशल मीडियाच्या भासमान दुनियेत २४ तास गुंतून राहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांना वास्तव जीवनात काय चालले आहे, याचे भान देणे आणि महाकुंभमेळ्याचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे.
पॉडकास्ट आणि ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’मधून मिळणारे शिक्षण फारच धोकादायक आहे. पूर्वी लोक निरक्षर होते, पण सध्याचे लोक साक्षर असूनही या ठिकाणांहून ज्ञान घेऊन एकप्रकारे निरक्षरच राहिले आहेत. या चुकीच्या माध्यमांमधून ज्ञान घेतल्यामुळे धर्माचे अपरिमित नुकसान होत आहे.
आजच्या काळात ऑनलाईन राहणे गरजेचे आहे, परंतु ‘रेंज’मध्ये राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही रेंजमध्ये राहिला नाही, तर तुम्ही आणि तुमची संस्कृती ‘हँग’ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आजच्या पिढीला सनातन धर्माचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या महाकुंभमेळ्याचे महत्त्व पटवून देणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने संस्कृतीतील मूल्ये आणि शिक्षण यांचे संक्रमण होऊ शकेल, असे निरंजननाथ महाराज यांनी स्पष्ट केले.

