क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
पुणे- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज येथील फुले वाड्यात येऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुलेंना आदरांजली वाहत कृतज्ञापूर्वक अभिवादन केले , यावेळी ते म्हणाले,क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या साथीनं त्यांनी महिलांसाठीची देशातील पहिली शाळा सुरु केली. त्यातून महिलांना शिक्षणाची दारं खुली झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आत्मविश्वासानं वावरत आहेत. महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. महिला त्यांच्या हक्कांबद्दल जागरुक झाल्या आहेत, याचं सर्व श्रेय महात्मा फुले-सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि हालअपेष्टांना आहे, याचा विसर पडता कामा नये. महात्मा जोतिबा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंश्रश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेदाविरोधात दिलेला लढा आणि सत्यशोधक विचारांची चळवळ पुढे घेऊन जाणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
महात्मा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारात नेऊन विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अनिष्ट रुढी-परंपरांविरोधात सत्यशोधक चळवळ उभारली.
सामाजिक न्यायावर आधारित प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ भारताचा पाया भक्कम करण्याचं फार मोठं काम फुलेंनी केलं. बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्वं पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” या संदेशानं देशात क्रांती घडवली.

