‘फुले’ चित्रपटातील दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप:प्रकाश आंबेडकरांचा इशारा; चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्याची मागणी
पुणे-महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित ‘फुले’या सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या चित्रपटात ज्याप्रकारे खरा इतिहास मांडला गेला आहे तो जसाच्या तसा प्रदर्शित केला जावा. सेन्सार बोर्डाकडून समाजावर परिणाम कोणत्या गोष्टीने होईल याची तपासणी केली जाते, पण संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. या चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे. सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार असून जर सेन्सार बोर्ड आपला विरोध कायम ठेवणार असेल तर, सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त फुले वाडयात फुले दाम्पत्याच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर बाेलताना ते म्हणाले, सरकारने महात्मा फुले यांचे वाडमय प्रसिध्द करणे गरजेचे आहे. चित्रपटातील दृश्य ही समग्र वाडमयावर आधारित असून जर सेन्सॉर बोर्डाने लावलेली कात्री काढली नाही तर आम्ही त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करु. चित्रपटातील दृश्य काढायला सांगणे म्हणजे विचारस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. सरकार एका बाजूला फुले यांना अभिवादन करते परंतु दुसऱ्या बाजूला त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध करते हा विरोधाभास थांबवला पाहिजे. त्यामुळे सदर चित्रपट आहे तशा तथ्यासह प्रदर्शित होणे महत्वाचे आहे.

