पुणे- स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टिकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असेल, तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते, असा दावा शुक्रवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. महात्मा फुले वाड्यामध्ये जाऊन उदयन राजे यांनी हे वक्तव्य केले .
खासदार उदयनराजे भोसले महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात फुलेवाडा येथे जात अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादामध्ये ते म्हणाले की, स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टीकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम काेणी पाऊल उचलले असेल, तर ते थाेरले प्रतापसिंह महाराज हाेते. त्यांनी स्वत:च्या सातारा येथील राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली हाेती. विशेष म्हणजे याच राजवाड्यात देशाचे संविधान निर्माण करणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील प्राथमिक शिक्षण झाले, असे दावाही त्यांनी केला.
उदयनराजे पुढे म्हणाले की, महात्मा फुले हे दूरदर्शी नेतृत्व हाेते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून सर्व समाज सुधारण्याचे कामाकरिता आयुष्य खर्ची केले. जे युगपुरुष हाेऊन गेले त्यांचे स्मारक जतन करणे आपले र्कतव्य आहे. त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळून सदर विचारांचे त्यांनी पालन करून ते आचरणात आणावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चे आयुष्यभर लाेकांकरिता व राज्यकारभारात लाेकांचा सक्रिय सहभाग असावा यादृष्टीने काम केले.
महापुरुष यांच्याबाबत सातत्याने अनुदगार काढले जातात हे दुर्देव आहे. महापुरुषांचा अपमान होऊ नये. याबाबत कठाेर कारवाई कायद्याने झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर दर्जेदार शासनमान्य ग्रंथ अद्याप प्रकाशित झालेला नाही. अनेकजण कल्पनेतून कादंबरी लिहितात. त्यावर एखादा चित्रपट निघताे आणि वाद निर्माण हाेतात. ऐतिहासिक गाेष्टी संर्दभ तपासणीसाठी एक तज्ञांचे सेन्साॅर बाेर्ड असावे, अशी मागणीही त्यांनी केली.
उदयनराजे म्हणाले की, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचा विषय कदाचित तांत्रिक किंवा पर्यावरण विषयक अडचणीमुळे रखडले असावे, पण जर त्याठिकाणी समुद्रात स्मारक करण्यासाठी अडचण येत असेल तर अरबी समुद्रालगत 48 एकर जागा उपलब्ध असून त्याठिकाणी महाराजांचे भव्य स्मारक करण्यात यावे. याबाबत मी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व इतरांशी देखील चर्चा केली आहे. त्यांनी यासंर्दभात स्पष्ट घाेषणा करावा अशी माझी अपेक्षा आहे.

