मुंबई- केंद्रीय गृहमंत्री उद्यापासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 12 एप्रिल रोजी ते रायगडावर भेट देतील. या दौऱ्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 72 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत जोरदार टीका केली. या घोटाळ्याची चौकशी करायची नव्हती, फक्त धमकावून सत्ता आणायची होती, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
2004 ते 2008 या काळात महाराष्ट्रात 72 हजार कोटींचा कथित सिंचन घोटाळा झाला होता. मात्र 2012 मध्ये तो उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे डिसेंबर 2014 मध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याविरोधात चौकशी सुरु करण्यात आली होती. 20 डिसेंबर 2019 रोजी अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती. सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेले सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा जाणार असल्यामुळे अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 72 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लेम नाही, असे दमानिया म्हणाल्या. 72 हजार कोटीचा सिंचन घोटाळा आठवतो का? त्याचे पुढे काय झाले? काहीच नाही ना? कारण आपले थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती. फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार? अतिउत्तम! ED आणि ACB आता गुंडाळून टाका, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.अमित शहा 12 एप्रिल रोजी रायगड दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 12 एप्रिल रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. रायगड किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील. यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार असल्याची माहिती आहे. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शाह हे सुनील तटकरे यांच्याकडे सुतारवाडीला रवाना होणार आहेत.
असा असेल अमित शहांचा महाराष्ट्र दौरा
दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता पुणे विमानतळावर आगमन.
12 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजता पाचाडमध्ये लँडींग
सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत रायगड किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 1.30 वाजता पाचाडवरुन टेक ऑफ
दुपारी 2 वाजता सुतारवाडी (सुनिल तटकरे निवासस्थान) येथे भोजनासाठी थांबणार असल्याची माहिती
दुपारी 3 वाजता मुंबईकडे रवाना
दुपारी 4 ते 6 विलेपार्ले कार्यक्रम (चित्रलेखा साप्ताहिकाचा कार्यक्रम – मुकेश पटेल सभागृह)
रात्री सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम
दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दिल्लीकडे रवाना

