“८०% समाजकारण, २०% राजकारण हेच शिवसेनेचे ब्रीद” – डॉ. गोऱ्हे
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मध्यप्रदेश दौऱ्यावर…
इंदोर – महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर असून, आज इंदोरमध्ये त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या सदिच्छा भेटीत शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटनेबद्दलचा अभिमान अधिक बळावला आहे.
“जो उत्साह आणि प्रेरणा तुम्ही दाखवलीत, त्यासाठी मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते आणि तुमचे अभिनंदन करते,” अशा शब्दांत डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “८०% समाजकारण आणि २०% राजकारण” हेच शिवसेनेचे खरे तत्व आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्याचा उल्लेख करत, “त्यांचा सन्मान प्रत्येक ठिकाणी होतो आणि कार्यकर्त्यांनाही त्याचा आनंद मिळतो,” असे त्यांनी नमूद केले.
या संवादात त्यांनी माजी आमदार अभिजीत अडसूळ यांचाही विशेष उल्लेख केला. “अभिजीत अडसूळ यांनी राष्ट्रीय पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत. मध्यप्रदेशसारख्या राज्यांमध्ये शिवसेनेची व्याप्ती वाढवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे,” असे गौरवोद्गार डॉ. गोऱ्हे यांनी काढले.
पुढे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “आपण भारताच्या शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी आणि विकासासाठी काम करतोय,” आणि त्याचबरोबर सामाजिक न्यायाच्या कार्यावरही भर देण्याचे आवाहन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे मार्गदर्शक असल्याचे सांगत, गरजूंसाठी आरोग्य शिबिरे, शिक्षणातील मदत यांसारख्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी सुचवले.
या बैठकीस सुरेश गुजर (मध्यप्रदेश संपर्कप्रमुख, इंदोर), राजीव चतुर्वेदी (राज्यप्रमुख, भोपाळ), नासिर कंसाना गुजर (प्रदेश सचिव), जितेंद्र चतुर्वेदी (महासचिव), भरत तिवारी (प्रदेश सचिव, इंदोर), जया सर्दाना (जिल्हा प्रभारी, इंदोर), वर्षा डोबियार (जिल्हा प्रमुख, इंदोर) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

