जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात ‘बाबूजी आणि मी’ कार्यक्रमात श्रीधर फडके यांचे सादरीकरण
पुणे : ‘ स्वयें श्रीरामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती’ अशा गीतांमधून उलगडणारे ‘गीत रामायण’, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर, सुधीर मोघे यांच्यासारख्या गीतकारांसोबत जुळलेले सूर, अशा अनेकविध आठवणींमधून ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचा जीवनप्रवास आणि संगीत प्रवास उलगडला.
श्री सद्गुरु जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने श्री सद्गुरु जंगली महाराज यांच्या १३५व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित ‘बाबूजी आणि मी’ या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी आपल्या वडिलांसोबतच्या अनेक आठवणींना सुरांनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी आपल्या वडिलांबरोबरच स्वतः संगीतबद्ध केलेली भावगीते आणि सुगमगीते सादर केली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर आणि अजय बहिरट यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. श्रीधर फडके यांना गायिका शिल्पा पुणतांबेकर, तबलावादक तुषार आंग्रे, सिंथेसायझर वादक ओमकार पाटणकर, तालवाद्य वादक आदित्य, आणि बासरीवादक निलेश देशपांडे यांनी सुरेल साथसंगत केली.
श्रीधर फडके म्हणाले, बाबूजींची बहुतेक सर्व गाणी ही शास्त्रीय संगीतावर आधारित असूनही सुगम आहेत. त्यांच्या गाण्यांमधील भाव रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तो प्रयत्न यशस्वी झाला तर मी स्वतःला एक कलाकार म्हणून धन्य मानतो.
कार्यक्रमाची सुरुवात सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या “देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देव्हाऱ्यात” या गीताने झाली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना आणि श्रीधर फडके यांचे संगीत असलेले ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ हे गीत सादर करत वातावरण भक्तिमय केले.
यानंतर गीतकार सुधीर मोघे यांचे ‘सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का’ हे सुधीर फडके यांनी गायलेले गीत सादर झाले. त्याचबरोबर ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ हे श्रीधर फडके यांनी स्वतः संगीतबद्ध केलेले गीत सादर करत, त्यांच्यात बाबूजींचा संगीत वारसा कसा उतरला आहे, हे दाखवून दिले. ‘रूपे सुंदर सावळा गे माय,’ ‘बाई मी विकत घेतला श्याम,’ ‘तोच चंद्रमा नभात’ अशा एकाहून एक सरस गीतांनी श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांनी मैफल रंगवली.–

