पुणे जिल्हयामध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुध्द राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाकडुन केलेली कारवाई.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसुली उत्पन्न, गुन्हा अन्वेषण व विविध अनुज्ञप्त्यांवर सन २०२३-२४ सालापेक्षा भरीव कामगिरी केली आहे.
डॉ. राजेश देशमुख (भाप्रसे), आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व श्री. जितेंद्र डूडी (भाप्रसे), जिल्हाधिकारी, पुणे तसेच सागर धोमकर, विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने जमा महसुल मध्ये सन २०२४-२५ या वर्षामध्ये सन २०२३-२४ च्या तुलनेत ९.८५ % वाढ नोंदविलेली आहे. सन २०२३-२४ मध्ये पुणे जिल्हयाचा महसुल रु. २७२९.४४ कोटी इतका जमा झाला होता. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये रु. २९९८.३३ कोटी इतका महसुल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
गुन्हा अन्वेषणाच्या कामगिरीमध्ये पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुलक विभागाने सातत्य राखले आहे. माहे एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळामध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द एकुण ५९९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ५८९१ आरोपींना अटक करण्यात आली असून ६२१ वाहने जप्त करण्यात आली. तसेच रु. २५.८० कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गत वर्षी विभागाने एकुण ३९८८ गुन्हे दाखल केले होते. एकुण ३६०४ आरोपीना अटक करुन त्यांच्या ताब्यातुन ४२२ वाहनासह रु. १८.४७ कोटी चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चालु वर्षी गुन्हा अन्वेषणाच्या कामगिरीमध्ये मागील वर्षेच्या तुलनेत ४०% वाढ झालेली आहे.
तसेच विभागाने प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ नुसार सराईत गुन्हेगारांविरुध्द एकुण ५७७ प्रस्ताव संबंधित दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. तसेच सराईत गुन्हेगाराकडून चांगल्या वर्तणूकीचे एकुण २९९ बंधपत्र घेण्यात आलेले आहे. त्यापैकी २९९ प्रकरणामध्ये रु. २ कोटी १८ लाख किंमतीच बंधपत्र घेण्यात आलेले आहेत. तसेच एम.पी.डी.ए कायदा १९८१ अंतर्गत दाखल केलेल्या एकूण ०९ प्रस्तावांपैकी ०१ प्रकरणात सराईत गुन्हेगाराविरुध्द स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध अनुज्ञप्तींचे सखोल निरीक्षण करण्यात येते, जे अनुज्ञप्तीधारक ठरवुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर विभागीय गुन्हे नोंद केले जातात. सन २०२४-२५ मध्ये अशा एकुण ५६९ अनुज्ञप्तीविरुध्द विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ०४ अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. तसेच सदर विभागीय विसंगती प्रकरणामध्ये रु. १ कोटी ८६ लाखाचा दंड अनुज्ञप्तीधारकांकडून वसुल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार अवैध धाब्यांवर मद्य विक्री करणाऱ्या विरुध्द तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकान विरुध्द एकुण ४५५ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकुण १२५० आरोपींना अटक करण्यात आली आहे. मा. न्यायालयाद्वारे आरोपींना एकुण रु. ८,१९,०००/- द्रव्य दंड ठोठविण्यात आलेला आहे. यामुळे केवळ अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुध्दच कारवाई न करता त्यासोबत सदर ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यां विरुध्द सुध्दा कारवाई करण्यात आलेली असल्यामुळे सदर अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना सुध्दा चाप बसणार आहे.
पुणे जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री तसेच परराज्यातील मद्य/अवैध ढाबे/अवैध ताडी विक्री विरुध्द कारवाई कठोर कारवाई करण्यासाठी एकुण २१ पथकांना निर्देश देण्यात आलेले असून अवैध मद्य व्यवसाया विरुध्द कारवाई करण्यात येत आहे. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांना अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतुक किंवा मद्य वाटप इ. संबंधी माहिती/तक्रार दयावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक. १८००२३३९९९९ व अधीक्षक कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक. ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

