सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात अध्यात्म आणि औषधोपचार या विषयावर व्याख्यान
पुणे : अध्यात्म आणि विज्ञान यांचा एकमेकांशी संबंध आहे. आपल्या संस्कृतीमध्ये हा संबंध अनेक वर्षांपासून सिद्ध झाला आहे. परंतु सध्याची तरुण पिढी आपल्या संस्कृतीपासूनच दूर जात असल्यामुळे अध्यात्म आणि सकारात्मक विचारांची सांगड घालता येत नाही. समाधानी आयुष्यासाठी अध्यात्म आणि सकारात्मक विचारांची सांगड घालता येणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील साठे यांनी व्यक्त केले.
सद्गुरु श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये डॉ. सुनील साठे यांचे अध्यात्म आणि औषधोपचार या विषयावर व्याख्यान झाले.
डॉ. सुनील साठे म्हणाले, अध्यात्म हे आपल्याला विचारांशी समतोल राहण्याचे सामर्थ्य देते. आपले विचार जर नकारात्मक असतील, तर त्याचा निश्चितच आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि आपले शरीर विविध व्याधींनी त्रस्त होते. अध्यात्माची जर सकारात्मक दृष्टीने आपल्या आयुष्यात सांगड घातली, तर निश्चितच आपले विचार सकारात्मक होऊन आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे आयुष्यात अध्यात्म आणि सकारात्मकतेची सांगड गरजेची आहे.
आजची तरुण पिढी ही भौतिक सुखाच्या मागे धावताना केवळ मॉडर्न आयुष्य जगण्याच्या शर्यतीमध्ये आपली संस्कृती आणि मूल्यांपासून दूर जात आहे. परंतु त्याचे दुष्परिणाम जे होत आहेत, त्याचे त्यांना भान राहिलेले नाही. चुकीच्या विचारांपासून त्यांना दूर नेण्यासाठी आणि त्यांना आपल्या संस्कृतीकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या संस्कृतीतील मूल्ये विविध माध्यमांद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असेही डॉ. सुनील साठे यांनी यावेळी सांगितले.

