मुंबई-मुंबईत मराठी व अमराठी वाद पेटला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर मनसे नेते व मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही यावर विचार करावा लागेल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर संदीप देशपांडे यांनी धमकीचा कॉल आल्याचे समोर आले आहे.
संदीप देशपांडे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, रात्री सव्वा दहा वाजता मला अज्ञात नंबरवरून फोन आला. फोनवर फक्त शिव्या घालत होता. त्यानंतर पुन्हा फोन केला तेव्हा मी कॉल रेकॉर्ड केला. तुम्हाला घरी येऊन मारू वैगेरे धमकी देत होता. असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. याबाबत मी पोलिस तक्रार केली आहे. कोणी जाणीवपूर्वक मुंबई आणि महाराष्ट्रातले वातावरण खराब करत आहे का याचा शोध घेतला पाहिजे. तसेच माझे राज ठाकरे यांच्याशी या प्रकरणावर बोलणे झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्याबाबत उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे हे हिंदूविरोधी आहेत, त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी सुनील शुक्ला यांनीयाचिकेतून केली होती. यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करणार असतील, तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असे संदीप देशपांडे म्हणाले होते.

