पुणे – पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये भूतानमधील २७ वर्षीय परदेशी महिलेनं सात जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला जबरदस्तीने वेश्याव्यसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला लोनावळा, रायगड आणि पानशेत येथील विविध ठिकाणी, आरोपींनी आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये लैंगिक अत्याचार करून वेश्याव्यसाय करून घेतला. अटकेतील आरोपींमध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती आहेत – एकजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी आहे, एक डीजे असून दुसरा वकील आहे.
प्रकरण असे कि, महिला २०२० पासून पुण्यात वास्तव्यास आहे. ती भारतात प्रथम २०२० मध्ये आली आणि सुरुवातीला बोधगयामध्ये राहिली. नंतर शिक्षण आणि नोकरीच्या हेतूनं ती पुण्यात आली, जिथे तिची ओळख आरोपी ऋषिकेश नवले याच्याशी झाली. त्याने तिची ओळख शंतनू कुकडे याच्याशी करून दिली. कुकडे याने तिला निवासाची आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या नावाखाली तिच्या असहायतेचा गैरफायदा आरोपीने घेतला.
मात्र, आरोप आहे की, शंतनू कुकडे याने या संधीचा गैरफायदा घेत महिलेस लैंगिक शोषणासाठी वापरले. कालांतराने त्याने तिची ओळख आपल्या इतर मित्रांशी करून दिली आणि ‘मित्रत्वाच्या’ नावाखाली तिला विविध पार्ट्यांमध्ये सहभागी करून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.
विविध ठिकाणी अत्याचार महिलेने सांगितले की, लोणावळा, रायगड व पानशेत येथील विविध ठिकाणी आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
शंतनू कुकडे – राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी (त्याच्यावर याआधी दोन महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे), ऋषिकेश नवले, जलिंदर बड्डे, उमेश शाहणे, प्रतीक शिंदे, वकील विपिन बिडकर, सागर रसगे या व्यतिरिक्त तक्रारीमध्ये अविनाश सूर्यवंशी आणि मुदस्सीर मेमन(व्यवसायीक) या दोघांची नावेही नमूद आहेत, ज्यांची चौकशी सुरू आहे.
आरोपींना वानखेडे मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले. पोलीस पथकाने ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपींच्या वतीने अॅड. तोसिफ शेख, अॅड. क्रांती साहाने, अॅड. स्वप्नील गिर्मे, अॅड. सूरज जाधव, अॅड. नेपा पिसे आणि अॅड. आदिल दतरंगे यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, सदर गुन्हा २०२० मध्ये घडलेला असून तक्रार दाखल करण्यास अत्यंत उशीर झालेला आहे. एवढा विलंब झाल्यामुळे फिर्यादीचा कथनावर संशय निर्माण होतो, त्यामुळे आरोपींना मॅजिस्ट्रेट कोठडी (MCR) द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने सर्व आरोपींना १२ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत (PCR) ठेवण्याचे आदेश दिले.

