अहमदाबाद – भाजपने फ्रॉड करूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्या. पण त्यानंतर भाजपने मतदार यादीत फेरफार करून तब्बल 50 लाख मतदार वाढवले. त्यानंतर भाजपच्या विधानसभा निवडणुकीत 150 पैकी 138 जागा निवडून आल्या. आता तुम्हीच सांगा ही कशी लोकशाही? हा कसा निवडणूक आयोग? ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली? सर्वकाही बोगस तयार करून हे जिंकले, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथे काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू झाले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी या अधिवेशनाला उपस्थित नेत्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त आरोप केला. ते म्हणाले, केंद्र सरकार स्वतःला फायदा व विरोधी पक्षांना नुकसान व्हावे या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान तयार करत आहे. पण आज नाही तर उद्या या देशातील तरुण जागे होऊन तुमचा हात पकडून आम्हाला ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान हवे असल्याचे ठणकावून सांगतील.
महाराष्ट्रात काय झाले? राहुल गांधी यांनी हा मुद्दा यापूर्वी संसद व माध्यमांपुढे उपस्थित केला. आम्ही सर्वजण बोललो. पण त्याचा सरकारवर कोणताही परिणाम झाला नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 50 लाख मतदान वाढले. आत्ता तुम्हीच सांगा, ही कशी लोकशाही? हा कसा निवडणूक आयोग? ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली? सर्वकाही बोगस तयार करून हे जिंकले.
मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक एक फ्रॉड असून, लोकशाहीला बसलेला मार आहे. हीच गोष्ट हरियाणातही झाली आहे. तिथे थोड्याफार प्रमाणात घोळ झाला, पण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात झाला. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. पण त्यानंतर तेथील मतदार यादीत खूप मोठा फेरफार करण्यात आला. त्याचा त्यांना विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. मी केव्हाच असे ऐकले नाही किंवा पाहिलेही नाही.
भाजपने महाराष्ट्रात 150 जागा लढल्या आणि 138 जागा जिंकल्या. 90 टक्के रिझल्ट आला. देशात असे कधीच झाले नाही. आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या. मी स्वतः 12-13 वेळा निवडणूक लढली. पण असे केव्हाच झाले नाही. जो फ्रॉड महाराष्ट्रात झाला, तो केवळ लोकशाहीला उद्ध्वस्त व तंग करण्यासाठी तथा विरोधकांना हरवण्यासाठी करण्यात आला. आपल्याला याविरोधातही लढायचे आहे.
मतदार यादीत होणारा फेरफार रोखण्यासाठी आमच्या नेत्यांनी व वकिलांनी मोठ्या प्रमाणात काम केले. पण त्यानंतरही आम्ही या प्रकरणी खूप मागे आहोत. आपण हे शोधून काढू. चोरी करणारा चोर आज नाही तर उद्या जरूर पकडला जातो. त्यामुळे आम्ही या प्रकरणी प्रयत्न करत आहोत.
मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी मध्यरात्री उशिरा वक्फ दुरुस्ती विधेयक तथा मणिपूर विधेयकासारखे महत्त्वाचे विधेयक पारित करण्याच्या मुद्यावरूनही नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, आज जे होत आहे तसे पूर्वी केव्हाच झाले नाही. जनतेशी निगडित महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्याऐवजी सरकारने जातीय ध्रुवीकरण करण्यासाठी मध्यरात्री 3-4 वाजेपर्यंत संसदेत चर्चा घडवून आली. मणिपूर सारख्या महत्त्वाच्या मुद्यावर मध्यरात्री उशिरा 4.30 वा. चर्चा सुरू झाली. मी अमित शहांना उद्या चर्चा करण्याची विनंती केली. या मुद्यांवर आम्हाला प्रकाश टाकायचा आहे. लोकांना मणिपूरमधील वस्तुस्थिती समजावून सांगायची आहे. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. याचा अर्थ सरकार जनतेपासून काही तरी लपवून ठेवत आहे.
सरकार आपले अपयश जनतेपासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामु्ळे ते मध्यरात्री संसदेत अशा मुद्यांवर चर्चा करत आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत संसद चालली. यावरून सरकार संसदेला किती गांभीर्याने घेते हे स्पष्ट होते. हे विधेयक पारित झाले तेव्हा संसदेत उपस्थित कुणी झोपत होते, कुणी बसलेले होते, तर कुणी इकडे-तिकडे पाहत होते. या स्थितीत मोदी सरकारने आपले विधेयक आणते. या माध्यमातून सरकार लोकशाही हळूहळू संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे खरगे म्हणाले.

