पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शंतनु कुकडे याच्या विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात पोलिस तपास करत असताना, भूतान येथील एका तरुणीने देखील सात ते आठ जणांविरोधात तक्रार दिल्याने आणखी नवीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील नामांकित वकील विपिन बीडकर यांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल म्हणाले, शंतनु कुकडे प्रकरणाचा पोलिस तपास करत असताना, कुकडे याच्या फाउंडेशन मार्फत भूतानची एक तरुणी मागील अनेक वर्षापासून त्याच्या सोबत राहत होती. सदर तरुणीची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती कुकडे याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून राहत असताना, कुकडे याच्या ओळखीतील अनेक जणांची ये-जा वेगवेगळ्या कारणाने, पार्टीकरिता सुरु असायची. यादरम्यान, एक वर्षापूर्वी विपिन बीडकर देखील सदर ठिकाणी येऊन त्यांनी तरुणीसोबत अतिप्रसंग केल्याची तक्रार तरुणीची आहे. त्यानुसार अॅड. बीडकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात आणखी सात ते आठ जणांवर ही विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास समर्थ पोलिस करत आहे.

