पुणे-भोर तालुक्यातील रस्त्यासंदर्भात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. श्रीक्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे, तो लवकरात लवकर करावा ह्या मागणीसह सरकारी अनास्थेचा निषेध करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून झालेले नाही हे खूप दुर्दैवी आहे. ज्या शहरामध्ये करोडो रुपयांची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात होत आहे. नितीन गडकरी यांच्याकडे कधीही कामासंदर्भात गेलो तर नाही म्हणत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वटीमच्या पाठपुराव्यामुळे सर्वच रस्ते झाले आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर हे अस्थेचे ठिकाण आहे. दीड किमीचा हा रस्ता होत नाही, हे दुर्दैव आहे. गेले 6 महिने आम्ही यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, किमान दुरुस्ती करावी अशी आमची मागणी आहे, पण सरकारकडून मोठा प्रोजेक्ट आहे असे सांगितले जाते पण हा प्लॅन आमच्या पदरात कधी पडणार असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे बनेश्वरला शाळांचा सहली जात असतात, लाखो भाविक जात असतात. पण आम्ही सर्व जणांनी ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा केला असला तरी हा रस्ता होत नाही. मागच्या वेळी हा रस्ता करुण देणार असा शब्द प्रशासनाने दिला होता. दीड किमीच्या रस्त्यासाठी हे सरकार नागरिकांना छळत आहे. आपण काही नवीन रस्ता मागत नाहीये, त्यामुळे परवानगीचा काही संबंध येत नाही. किमान रस्त्यावरील खड्डेतरी बुजवले पाहिजे एवढीच आमची मागणी आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर ही आमच्या सर्वांच्या निष्ठेची जागा आहे. या विषयामध्ये आम्हाला रातकारण आणायचे नाही. तिथे अनेक जण कायम जात असतात, महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या श्रद्धचे स्थान आहे. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मदत केली आहे तर केलीच म्हणावे लागेल. पालखी मार्गाने आपण सर्व जण जातो आहोत, गडकरी यांच्याकडे कोणताही खासदार गेला तर त्याच्या मतदारसंघातील रस्त्याची कामे होतातच.
बनेश्वर देवस्थानचे विश्वस्त म्हणाले की, आमची केवळ एकच मागणी आहे. आमचा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. आम्ही निवेदन देऊनही रस्ता झालेला नाही. तरी तो रस्ता जितक्या लवकर करता येईल तो करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

