पुणे- दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे उपचार चांगले , डॉक्टर उत्तम पण प्रशासनाच्या उद्दाम पणामुळे सारे काही बिघडले भाजपच्या महिला अध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी दिनानाठ्चे डॉक्टर घैसास यांच्या विरोधात केलील आंदोलन आणि त्यांच्या क्लिनिक ची केलेली मोडतोड यावर राज्यसभा सदस्य असलेल्या भाजपच्या कोथरूड च्या महिला नेत्या मेधा कुलकर्णी या संतप्त झालेल्या असल्याचे एकीकडे वृत्त झळकलेले असताना राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खुद्द मेधा कुलकर्णी यांच्या समोरच हर्षदा फरांदे यांनी केलेल्या आंदोलनाचे कौतुक केल्याने काल एका बैठकीतून मेधा कुलकर्णी यांनी तातडीने काढता पाय घेतला . यामुळे कोथरूड मधील या ३ नेत्यांमध्ये आता २ मंत्री विरुद्ध एक राज्यसभा सदस्य असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
काल रात्री भारतीय जनता पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये भाजपा महिला आघाडीच्या हर्षदा फरांदे यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटणार याची कल्पना सुरुवातीपासूनच होती आणि झालेही तसेच. चंद्रकांत पाटील यांनी महिला आघाडीच्या आंदोलनाची उघड पाठराखण करत, ‘महिला आघाडीने केलेले आंदोलन त्यांच्या घरासाठी नव्हे तर संघटनेसाठी होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने झाले देखील असेल, पण यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होता कामा नये’ असं म्हटलं आहे.तर दुसरीकडे फक्त चंद्रकांत पाटीलच नव्हे तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा महिला आघाडीच्या आंदोलनाची पाठराखण केली. ‘१९ वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून तोडफोड झाली होती. ती चुकीचीच होती, पण कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. तुम्ही जशास तसे उत्तर द्यायला शिका. एखादा पक्षाचा नेता चुकीचं सांगत असेल तर तुम्ही चुकीचं बोलताय असं म्हणायला शिका’. असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी आंदोलनाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये आता दोन मंत्री विरुद्ध खासदार असा संघर्ष उभा राहतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.भारतीय जनता पक्षाची ही बैठक सायंकाळी साडेचार वाजता सुरू होणार होती. या बैठकीसाठी खासदार मेधा कुलकर्णी या चार वाजताच बैठक स्थळी उपस्थित राहिल्या. मात्र बैठक सुरू होण्यासाठी तब्बल साडेपाच ते पावणे सहा वाजले. या बैठकीनंतर मेधा कुलकर्णी यांचे काही नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमाचे कारण देत बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच मेधा कुलकर्णी बैठकीच्या बाहेर पडल्या. मात्र कुलकर्णी बैठकीतून बाहेर पडत असताना मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांचे भाषण बाकी होते.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाची महिला आघाडीने फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरच आंदोलन केलं नाही, तर या सगळ्या प्रकरणात ज्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता त्यांच्या कुटुंबीयांचं क्लिनिक देखील फोडलं होतं. या आंदोलनावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहिलं आणि आंदोलकांना समज द्यावी असं म्हटलं होतं. या पत्रानंतर भाजपमध्ये उघड दोन गट पडल्याचे पाहायला मिळालं. आता याचेच पडसाद काल रात्री झालेल्या भाजपच्या अंतर्गत बैठकीत देखील उमटल्याचे चित्र होते.

