पुणे-
नीती आयोग, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने 9 एप्रिल 2025 रोजी पुण्यात यशदा येथे “भारतामध्ये सहाय्यक तंत्रज्ञानासाठी अनुकूल परिसंस्था विकसित करणे” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे या कार्यशाळेचे उद्घाटन करणार असून यावेळी महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल उपस्थितीत राहणार आहेत.
दिव्यांग, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या असलेल्या व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेता, भारतात सहाय्यक उपकरणे आणि उत्पादनांची आवश्यकता वाढत चालली आहे. ही सहाय्यक उपकरणे आणि उत्पादने या व्यक्तींच्या जीवनाची गुणवत्ता वाढवतात तसेच अधिक समतापूर्ण आणि समावेशक समाजाच्या विकासाला हातभार लावतात. देशातील तंत्रज्ञान विषयक विकास आणि उत्साही स्टार्ट-अप परिसंस्थेत झालेल्या प्रगतीमुळे भारताला केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर इतर देशांच्या गरजा भागविण्यासाठी देखील सहाय्यक तंत्रज्ञान (AT) उत्पादन केंद्र बनण्याची प्रचंड क्षमता आहे.
या कार्यशाळेत सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही कार्यशाळा केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधन संस्था आणि सहाय्यक तंत्रज्ञान (AT) उद्योग/स्टार्टअप्स यासारख्या विविध भागधारकांना भारतातील सहाय्यक तंत्रज्ञानाची वर्तमान आणि भविष्यातील परिस्थिती यावर चर्चा करण्यासाठी तसेच देशात सहाय्यक तंत्रज्ञानाला (AT) प्रोत्साहन देण्यासाठी एक परिसंस्था विकसित करण्यासाठी मिळालेल्या सूचनांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. भारतातील सहाय्यक तंत्रज्ञानाची उपलब्धता सुधारणे, सहाय्यक तंत्रज्ञानातील राज्य उपक्रम, सहाय्यक तंत्रज्ञान उत्पादने आणि जागतिक सहकार्य या विषयांवर या कार्यशाळेत चर्चा होईल.
कार्यशाळेत होणाऱ्या चर्चा आणि मिळणाऱ्या सूचना भारतात सहाय्यक तंत्रज्ञानासाठी परिसंस्था विकसित करण्यासाठी तसेच ‘विकासात कोणीही मागे राहणार नाही’ या तत्वाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात योगदान देईल.

